कला, क्रीडा आणि संस्कृतीमधून उमटला दिव्यांगांच्या प्रतिभेची छटा
प्रत्येक दिव्यांग विद्यार्थी वेगळ्या प्रतिभेचा धनी -संध्या गायकवाड
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण विभाग, रिमांड होम केंद्र आणि प्रगत माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन तसेच समता दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
सावित्रीबार्इ फुले यांच्या वेशभूषेत असलेली दिव्यांग विद्यार्थिनी तनुजा पवार हिच्या हस्ते आकाशात फुगे सोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड व प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी या उपक्रमाद्वारे समानता, संवेदना आणि सामाजिक समावेशकतेचा संदेश दिला. यावेळी मनपा प्रशासनाधिकारी जुबेर पठाण, समग्र शिक्षा कार्यक्रम अधिकारी दादासाहेब नरवडे, विशेष शिक्षक उमेश शिंदे व रामेश्वर ढगे, प्रोग्रेसिव्ह एज्यु. सोसायटीचे खजिनदार उमेश रेखे, सचिव किरण वैकर आणि प्राचार्य सुनील पंडित यांच्या उपस्थितीत पार पडला.
शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड म्हणाल्या की, प्रत्येक दिव्यांग विद्यार्थी वेगळ्या प्रतिभेचा धनी आहे. त्यांच्या सहवासातून नवी ऊर्जा, सकारात्मक विचार आणि प्रेरणा मिळते. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सामान्य व विशेष शिक्षकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
रिमांड होम केंद्रात मागील पाच दिवसांपासून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांना वाव मिळावा यासाठी चित्रकला, क्रीडा स्पर्धा, नृत्य, कथाकथन, ब्रेल लेखन आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष शिक्षक उमेश शिंदे आणि रामेश्वर ढगे यांनी या उपक्रमाचे उत्तम नियोजन केले. विविध शाळांतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी या सर्व स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतला. कार्यक्रमावेळी तनुजा पवार हिने सादर केलेले नृत्य आणि अनाम प्रेममधील दिव्यांग विद्यार्थी कलेश्वर लोहार व प्रशांत काटे यांचे गायन विशेष आकर्षण ठरले.
ब्रेल लेखन स्पर्धा- प्रज्वल कुसमुडे, गोरख माने, राम थिटे, नृत्य स्पर्धा- तनुजा पवार, गायन स्पर्धा- कलेश्वर लोहार, प्रशांत काते, काजल अस्वले, क्रीडा स्पर्धा- सुशील मंचरे, चित्रकला स्पर्धा- संजना मिटकर, नीलम गर्जे, सिद्धांत शिवरात्री यांनी बक्षिसे पटकाविली. विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात आले.
मनपा प्रशासनाधिकारी जुबेर पठाण यांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट गायनाचे कौतुक करत, रिमांड होम केंद्रातील विशेष शिक्षकांच्या मेहनतीचे विशेष कौतुक केले.
प्रास्ताविकात उमेश शिंदे यांनी जागतिक दिव्यांग दिनाचे महत्त्व विशद करुन कार्यक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप रोकडे यांनी केले. आभार प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार उमेश रेखे यांनी मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
