15 ऑक्टोबर पर्यंत होणार सर्व तालुक्याचे निवड चाचण्या
जिल्हा तालीम संघाच्या बैठकीत निर्णय
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी घेण्यासंदर्भात अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत 21 ऑक्टोबर रोजी केडगाव देवी येथे जिल्ह्याची निवड चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्जेपुरा येथील जिल्हा तालीम संघाच्या कार्यालयात जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीप्रसंगी खजिनदार पै. नाना डोंगरे, पारनेर तालीम संघाचे अध्यक्ष पै. युवराज पठारे, नगर शहराध्यक्ष पै. नामदेव लंगोटे, श्रीरामपूरचे अध्यक्ष दीपक डावखर, जामखेड तालुका अध्यक्ष श्रीधर मुळे, नेवासा तालुका तालीम संघाचे सचिव संभाजी निकाळजे, पाथर्डी तालुका तालीम संघाचे उपाध्यक्ष पप्पू शिरसाठ, शहर उपाध्यक्ष विलास चव्हाण, कार्याध्यक्ष अजय आजबे, सचिव मोहन हिरणवाळे सहसचिव सुनील भिंगारे, गणेश जाधव, भारत शिंदे, सुनील खपके, सुरेश होन, आबा बडाख, अशोक साळुंके, गोकुळ शिंदे, अशोक पानकडे, संदीप वाघमारे आदी उपस्थित होते.
जिल्हा निवड चाचणीचे यजमानपद हर्षवर्धन कोतकर यांनी स्विकारले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची जिल्हा निवड चाचणी गादी विभाग व माती विभागात होणार आहे. जिल्हा व तालुका निवड चाचणी 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 व महाराष्ट्र केसरी वजन गटात होणार आहे. सर्व तालुकास्तरावर निवड चाचणी होवून विजेते मल्ल जिल्हा निवड चाचणीसाठी पात्र ठरणार आहे. जिल्हा निवड चाचणीमध्ये पात्र झालेले कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पाठविले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना तालुका तालीम संघ अध्यक्षांच्या निवड चाचणी प्रमाणे खेळता येणार आहे. खेळाडूंसाठी आधार कार्ड व ओळखपत्र अनिवार्य असणार आहे. सर्व तालुकास्तरीय निवड चाचण्या 15 ऑक्टोबर पर्यंत घेण्यात येणार आहे.
एका तालुकास्तरीय निवड चाचणीत पराभूत झालेल्या मल्लास दुसऱ्या कोणत्याही तालुक्यातून खेळता येणार नाही. स्पर्धेच्या अगोदर तालुका बदली करण्यास परवानगी देण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. पै. वैभव लांडगे यांनी जिल्हा व तालुकास्तरीय स्पर्धेच्या नियोजना संदर्भात पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.
