बुलढाणा येथे झाला सन्मान
महार रेजिमेंटने शौर्य, शिस्त व पराक्रमाने भारतीय लष्करात ठसा उमटवला -राजू शिंदे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- यश सिद्धी सैनिक सेवा संघाच्या वतीने 85 व्या महार रेजिमेंट स्थापना दिन बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या राज्यव्यापी मेळाव्यात या सोहळ्यात यश सिद्धी सैनिक सेवा संघ, अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष व बहुजन समाज पार्टीचे जिल्हा महासचिव राजू शिंदे यांचा सामाजिक कार्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला.
आमदार संजय गायकवाड, कर्नल सुहास जतकर व सिद्धी सेवा संघाचे अध्यक्ष अनिल डोंगरदिव यांच्या हस्ते शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास प्रा. डॉ. अस्मिता मनवर, सेवा संघाचे सचिव चंद्रकांत खरात, प्रा. शायना पठाण, सुभेदार मेजर त्र्यंबक इंगळे, सुनील सुरडकर, राजू पवार, बाजीराव गवळी, शंकर हिवाळे आदींसह महाराष्ट्रातील सर्व आजी-माजी सैनिक उपस्थित होते.
यावेळी विविध सांस्कृतिक, वैचारिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यश सिद्धी सैनिक सेवा संघ दरवर्षी महार रेजिमेंट स्थापना दिनाला स्वाभिमान सोहळा म्हणून साजरा केला जातो. यामध्ये शौर्यगाथा सांगणारे सांस्कृतिक कार्यक्रम, विचारमंथन, शहीद कुटुंबीयांचा गौरव आणि युद्धवीरांच्या मिरवणुकीद्वारे देशभक्तीचा जागर करण्यात आला. महार रेजिमेंटचा शौर्यमयी इतिहास व भारतीय सेनेतील योगदान याचा प्रचारप्रसार आणि शहीदांचे स्मरण हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश होता.
राजू शिंदे म्हणाले की, आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे. महार रेजिमेंटने आपल्या अदम्य शौर्य, शिस्त व पराक्रमाने भारतीय लष्करात ठसा उमटवला आहे. देशासाठी रक्त सांडणाऱ्या शहीदांचा आपण जितका गौरव करू तितका कमीच आहे. सैनिक म्हणजे फक्त सीमारेषेवर उभा राहणारा नाही, तर तो समाजातील प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी आदर्श असतो. यश सिद्धी सैनिक सेवा संघाने गेली अनेक वर्षे या दिवशी स्वाभिमान सोहळा साजरा करून सैनिकांचा गौरव आणि शौर्यकथा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. तर हा सन्मान हा केवळ माझा नाही, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याचा, समाजातील प्रत्येक सैनिकाचा असल्याचे ते म्हणाले.