• Wed. Jan 21st, 2026

जिल्हा मराठाची AI (एआय) आधारीत अध्यापनाकडे वाटचाल

ByMirror

Jan 14, 2026

राळेगणचे एआय द्वारा कृतीयुक्त अध्यापन संस्थेत आदर्श – सचिव ॲड. विश्‍वासराव आठरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्व क्षेत्रात एआय (AI) आधारीत तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागला असून अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सर्व शाळांमध्ये या आधुनिक तंत्राचा उपयोग करून दर्जेदार अध्ययन – अध्यापन व्हावे म्हणून श्रीराम विद्यालय राळेगण या विद्यालयात इंटरॅक्टीव्ह डिजीटल बोर्ड व Al सारखे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून होत असलेल्या अध्यापना संदर्भात माहिती सर्व शाखा शाळांना व्हावी म्हणून नगर तालुक्यातील राळेगण येथे जिल्हास्तरीय संस्थांतर्गत मुख्याध्यापक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.


या प्रसंगी संस्थेचे सचिव विश्‍वासराव आठरे पाटील म्हणाले की, श्रीराम विद्यालयाने लोकसहभागातून इंटरॅक्टीव्ह बोर्डच्या मदतीने डिजीटल अध्यापनात AI तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस फायदा झाला असल्याने या विद्यालयाचा आदर्श सर्व शाळांनी घ्यावा व सर्व शाखा शाळांमधून लोकसहभाग व संस्थेच्या तांत्रिक सहकार्यातून एआयच्या वापराकडे लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले.


जी.डी. खानदेशे यांनी श्रीराम विद्यालयाचा 17 वर्षे शंभर टक्के निकाल, स्कॉलरशिप पात्र विद्यार्थी, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचलेले खेळाडू यामुळे विद्यालयाने संस्थेत एक आदर्श निर्माण केल्याचे मत व्यक्त केले. तर लोकसहभागातून इंटरॅक्टीव्ह बोर्ड, पेव्हर ब्लॉक, सरंक्षक भिंत, रंगरंगोटी, ओपन जीम, स्वागत कमान व गुणवत्तेत असणारे सातत्य यामुळे विद्यालय संस्थेचे आयडॉल ठरले असल्याचे मत संस्थेचे सहसचिव मुकेशदादा मुळे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी संस्थेच्या खजिनदार दिपलक्ष्मी म्हसे मॅडम, विश्‍वस्त जयंत वाघ, संस्था निरीक्षक उत्तमराव राजळे व हरीभाऊ जावळे उपस्थित होते.


सभेच्या सुरुवातीस राजामाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय जाधव यांनी विद्यालयातील एआय आधारीत अध्यापन, विद्यालयात उभारावयाच्या STEM Lab बाबत व विद्यालयाच्या गुणवत्तेच्या चढत्या आलेखाचा आढावा मांडला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर पाटील भापकर व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रसाद दुरेकर यांनी शाळेच्या प्रगतीत लोकसहभागातून करण्यात आलेल्या व भविष्यातील योजनांची माहिती दिली. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान, माजी विद्यार्थी संघ, लोकसहभाग या बाबत राजेंद्र कोतकर यांनी, तर संस्थांतर्गत विविध विषया बाबत संस्था निरीक्षक उत्तम राजळे व हरीभाऊ जावळे तसेच भानुदास दळवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


सकाळ सत्रात प्रत्येक वर्गात अध्यापनात विद्यार्थ्यांचा सहभाग, एआय आधारीत अध्यापन, स्पर्धा परीक्षा तयारी, लोक सहभागातील कामे, आयसीटी लॅब, प्रयोगशाळा या संबंधीत प्रत्यक्ष माहिती मुख्याध्यापकांनी घेतली व परीक्षणही केले. सभेचे सूत्रसंचलन संजय भापकर यांनी तर आभार कैलास गुंड यांनी मानले. या वेळी उपस्थितां मधून दत्ता पाटील नारळे, रेसिडेन्शिअलचे प्राचार्य विजय पोकळे, आप्पासाहेब शिंदे यांनी मनोगतातून विद्यालय राबत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक विजय जाधव, राजश्री जाधव, कैलास गुंड, हरीभाऊ दरेकर, राजेंद्र कोतकर, संजय भापकर, सुजय झेंडे, निळकंठ मुळे, आकाश मनवरे, बाळासाहेब कुताळ, विशाल शेलार, विशाल मुळे, रामदास साबळे, आकांक्षा शेलार, सुरेश झांबरे यांनी प्रयत्न केले. या सभेस संस्थांतर्गत सर्व शाळांतील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *