नेवासा फाटा येथील त्रिमूर्तीमध्ये जिल्हास्तरीय शालेय कुस्तीचे उद्घाटन
अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय व त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान येथे उत्साहात पार पडले. जिल्ह्यातील कुस्तीपटूंचा उत्सफुर्त सहभाग लाभलेल्या या स्पर्धेत कुस्तीचा थरार रंगला होता.
गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांच्या हस्ते कुस्ती लावून स्पर्धेचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे सचिव मनिष घाडगे, प्राचार्य सोपानराव काळे, जिल्हा तालिम संघाचे खजिनदार पै. नाना डोंगरे, क्रीडा प्रमुख संजयसिंह चौहान, पाथर्डीचे पंचायत समितीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठ, पारनेर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष बापू होळकर, शेवगाव तालुका तालिम संघाचे अध्यक्ष विक्रम बारवकर, भाऊसाहेब धावडे, आशिष आचारी आदींसह ग्रामस्थ व जिल्ह्यातील खेळाडू व पालक उपस्थित होते.

पंच म्हणून प्रा.संभाजी निकाळजे, गणेश जाधव, संजय डफळ, ईश्वर तोरडमल, तानाजी नरके, गणेश शेजूळ यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य सोपानराव काळे यांनी स्पर्धेची माहिती दिली. क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांनी कुस्तीला चांगले दिवस आले असून, खेळाडूंना उत्तम करिअरची संधी निर्माण झाली आहे. क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी युवकांना व्यसनाच्या आहारी न जाता, कुस्ती खेळातून आपले शारीरिक स्वास्थ्य जपण्याचा संदेश दिला. तर कुस्ती खेळाने सक्षम युवक घडणार असल्याचे सांगून, खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोकराव गाडे यांनी केले. आभार संजयसिंह चौहान यांनी मानले.
