विविध स्पर्धेचा समावेश; जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत व जय युवा अकॅडमीचा उपक्रम
युवा सप्ताह युवक-युवतींच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा ठरणार -ज्ञानेश्वर खुरंगे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- क्रीडा युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य (पुणे) अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर, मेरा युवा भारत व जय युवा अकॅडमीच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त दि. 12 ते 19 जानेवारी दरम्यान शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती यांच्यासाठी विविध स्पर्धा, जनजागृती उपक्रम, आरोग्य शिबिर व कायदेविषयक मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये निबंध, वक्तृत्व, हस्ताक्षर, चित्रकला, वैयक्तिक नृत्य, समुह नृत्य, मेहंदी, पथनाट्य व कुस्ती स्पर्धेचा समावेश आहे. त्याचबरोबर परंपरा व संस्कृती जोपासण्यासाठी जिल्हास्तरीय खुल्या भजन स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. युवकांना कायदेविषयक मार्गदर्शन, मोफत आरोग्य शिबिर, लोककला सादरीकरण आदींचे आयोजन करण्यात आले आहे. हे उपक्रम गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात होणार आहे. युवा सप्ताह युवक-युवतींच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा ठरणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, मेरा युवा भारतचे जिल्हा समन्वय अधिकारी सत्यजित संतोष व जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांनी दिली.
सोमवारी 12 जानेवारी रोजी माळीवाडा येथील श्रीकांत पेमराज कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन होणार असून यामध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सावेडी येथील छत्रपती संभाजी राजे कुस्ती संकुल मध्ये कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी ॲड. दिनेश शिंदे, ॲड. गायत्री गुंड, ॲड. तुषार शेंडगे, ॲड. सुरेश लगड, आरती शिंदे, पोपट बनकर, ॲड. अनिता दिघे, रजनी ताठे, बाळासाहेब पाटोळे, भाऊसाहेब पादीर, प्रा. हर्षल आगळे, ॲड. शकील पठाण, जयश्री शिंदे आदी परिश्रम घेत आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व विजेत्यांना आकर्षक स्मृती चिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 9579616484, 9657511869 व 9834298309 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
