• Thu. Mar 13th, 2025

जिल्हा फुटबॉल असोसिएशनचा खेळाडू भानुदास चंद यांची फिफा इंडिया टॅलेंट हंट साठी निवड

ByMirror

Feb 28, 2025

राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी; महाराष्ट्रातील तीन खेळाडूंचा समावेश

नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचा खेळाडू भानुदास चंद यांची एआयएफएफ-फिफा इंडिया टॅलेंट हंट साठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातून फक्त तीन खेळाडूंची निवड झाली असून, त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातून भानुदास चंद याचा समावेश आहे. त्याची झालेली निवड ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद आणि फुटबॉलसाठी यशाचा मोठा टप्पा असल्याचे असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


भानुदास 1 मार्च रोजी भुवनेश्‍वरला या ट्रायल्ससाठी रवाना होत आहे, जिथे तो देशभरातील उत्कृष्ट युवा खेळाडूंशी स्पर्धा करणार आहे. तो आठरे पाटील पब्लिक स्कूलचा विद्यार्थी असून, शाळा प्रशिक्षक संदीप दरंदले यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे फुटबॉल कौशल्य विकसित झाले आहे. तसेच शालेय अध्यक्ष डॉ. अनिल आठरे यांच्याकडून त्याला खेळासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. त्याची निवड प्रथम फिरोदिया शिवाजीयन्स आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत झाली, जिथे त्याने आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व केले.


या स्पर्धेत त्याला एडीएफएच्या सी लायसन्स प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण मिळाले, ज्यामुळे त्याचा खेळात आनखी सुधारणा झाली. यानंतर त्याने अहिल्यनगरच्या संघाकडून आंतरजिल्हा स्पर्धेत खेळताना अप्रतिम कामगिरी केली, ज्यामुळे संघाने 15 वर्षा आतील आंतर जिल्हा उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. ही कामगिरी सहसा मोठ्या महानगरांतील संघच करू शकतात, त्यामुळे भानुदासने नगर जिल्ह्याच्या फुटबॉल क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.


आंतरजिल्हा शिबिरात, त्याला एडीएफएचे सचिव तसेच माजी राष्ट्रीय व पुणे विद्यापीठाचे खेळाडू रौनप फर्नांडिस यांनी मार्गदर्शन केले. तसेच राजू पाटोळे, जेव्हिअर स्वामी, व्हिक्टर जोसेफ, वैभव मनोदिया, खालिद सय्यद, ऋषिपालसिंह परमार आणि प्रदीप जाधव यांनी त्याला प्रेरणा आणि प्रशिक्षकांचे पाठबळ दिले.


अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन सतत युवा खेळाडूंना उत्तम संधी मिळवून देण्यासाठी नियमित फुटबॉल स्पर्धा आणि प्रशिक्षण शिबिरे आयोजित करत आहे. भानुदास चंद हा राष्ट्रीय स्तरावर यशस्वी होईल आणि फिफाच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात स्थान मिळवेल, अशी अपेक्षा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.


जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया आणि वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी भानुदासच्या सुरक्षित प्रवासाची संपूर्ण जबाबदारी घेतली असून, त्याला या फिफा इंडिया टॅलेंट हंट साठी आवश्‍यक ती सर्व मदत उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *