मोरया युवा प्रतिष्ठानचा उपक्रम
भजन-कीर्तनात भाविक तल्लिन
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड, आनंदनगर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भजन-कीर्तनाचा कार्यक्रम रंगला होता. या धार्मिक सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांना मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने उपवासासाठी फराळाचे पदार्थ वाटप करण्यात आले.
आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोरया युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन मदान यांनी हा उपक्रम राबविला. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांच्या गजराने किर्तनाला सुरुवात झाली. भावभक्तीच्या कार्यक्रमात भाविक तल्लिन झाले होते. मुळेताई यांनी सादर केलेल्या किर्तनात भाविक मंत्रमुग्ध झाले. संध्याकाळ पर्यंत चाललेल्या भजन-किर्तनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.
अर्जुन मदान म्हणाले की, मोरया युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. विविध सण-उत्सव साजरे करुन संस्कृती जोपासण्याचे काम केले जात आहे. या उपक्रमासाठी आमदार संग्राम जगताप यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मंदिर ट्रस्टच्या अनुराधा खोसे, मंगल देशपांडे, सरस्वती सावंत, कुमुदिनी गुजराथी, अभिलाषा मदान, अर्चना मदान, सुनंदा अवटेकर, कमल सोले, शांती शर्मा आदींसह भजनी मंडळाच्या महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.