गुरू अर्जुन देव मानवतेचे खरे सेवक व धर्माचे रक्षक ठरले -सचिन जगताप
नगर (प्रतिनिधी)- शीख धर्माचे पाचवे गुरु अर्जुन देवजी यांच्या शहिदी दिनानिमित्त तारकपूर येथे गुरु नानक देवजी (जीएनडी) ग्रुपच्या वतीने नागरिकांना लंगर (प्रसाद) व सरबतचे वाटप करण्यात आले. गुणे आयुर्वेदिक महाविद्यालयचे अध्यक्ष सचिन जगताप यांच्या हस्ते प्रसाद वाटपाला प्रारंभ झाले.
या कार्यक्रमाप्रसंगी जनक आहुजा, संजय आहुजा, जितू गंभीर, राकेश गुप्ता, किशोर कंत्रोड, मॉन्टी तलवार, गुरली अवतार, करण आहुजा, परभ गुलाटी, मनीष खुराना, विकी कंत्रोड, रोहित बत्रा, काजल गुरु, राजेश कंत्रोड, कुणाल गंभीर, गिरीश खन्ना, विजय मनोचा, सागर कुमार, अक्षय खुराना आदी उपस्थित होते.
सचिन जगताप म्हणाले की, गुरू अर्जुन देव मानवतेचे खरे सेवक व धर्माचे रक्षक ठरले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लोकांची सेवा केली. तर अन्यायापुढे न झुकता शहिद झाले. अमानुष छळ सहन करुन धर्माप्रती ते निष्ठावान राहीले. शीख धर्मासाठी शहीद होणारे पहिले गुरू म्हणून ते अजरामर झाले. त्यांचे हौतात्म्य हे शीख धर्माच्या इतिहासाला कलाटणी देणारे ठरले. त्यांचे बलिदान आजही समाजासाठी प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.
जनक आहुजा म्हणाले की, गुरु अर्जुन देवजी यांनी अमृतसर येथे असलेल्या गुरु रामदास सरोवरचे काम पूर्ण केले. शीख धर्मात असलेले गुरु ग्रंथ साहेब यांनी लिहून पूर्ण केले व त्याबाबत जनजागृती केली. ही जनजागृती मुघल साम्राज्याला बाधा आणणारी ठरल्याने त्यांनी गुरु अर्जुन देवजी यांचा अमानुषपणे छळ केला. धर्मासाठी त्यांनी अन्यायापुढे न झुकता आपली शहिदी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.