जायंटस् ग्रुप ऑफ अहिल्यानगरचा सेवाभावी उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- जगाला अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याण दिनानिमित्त जायंटस् ग्रुप ऑफ अहिल्यानगरच्या वतीने प्राणीमात्रांप्रती आपुलकी दाखविणारा उपक्रम राबविण्यात आला. अरणगाव रोडवरील पांजरपोळ गोरक्षण संस्थेमध्ये जनावरांना चारा वाटप करण्यात आले तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेत औषधे देखील पुरविण्यात आली.
या उपक्रमाच्या निमित्ताने अनेक सदस्यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन सेवा कार्यात योगदान दिले. जायंटस् वेल्फेअर फाउंडेशनचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे, ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, सचिव अभय मुथा, अनिल गांधी, दर्शन गुगळे, अमित मुनोत, श्वेता मुनोत, नूतन गुगळे, आशा कवाने, अंश मुनोत, पूजा पाथुरकर आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय गुगळे म्हणाले, भगवान महावीर यांनी आयुष्यभर अहिंसेचा, करुणेचा आणि सेवा भावनेचा प्रचार केला. त्यांच्या शिकवणुकीनुसारच आपण या जयंतीनिमित्त प्राणीमात्रांप्रती माणुसकीचे कर्तव्य बजावत आहोत.
समाजामध्ये दयाभाव वाढवणे, निसर्ग आणि प्राणिमात्रांशी सुसंवाद साधणे हे आपल्या प्रत्येकाच्या जबाबदारीचं आहे. अशा उपक्रमांमुळे केवळ प्राणीच नव्हे तर मानवतेचाही सन्मान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या सेवाभावी उपक्रमामुळे गोरक्षण संस्थेतील जनावरांना आधार देण्याचे काम करण्यात आले. भविष्यात देखील असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्याचा मानस या ग्रुपच्या वतीने व्यक्त करण्यात आले.