• Fri. Aug 1st, 2025

ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

ByMirror

Jun 19, 2024

लग्नाच्या रौप्य महोत्सवी वाढदिवसानिमित्त बाबासाहेब बोडखे यांचा सामाजिक उपक्रम

बोडखे यांनी कचरा वेचकांच्या मुलांपासून ते दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलेली मदत प्रेरणादायी -महेंद्र शिरसाट

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. बोडखे परिवाराच्या वतीने दरवर्षी सातत्याने गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्याचे कार्य केले जात आहे.


लग्नाच्या रौप्य महोत्सवी वाढदिवसानिमित्त पाथर्डी तालुक्यातील संत ज्ञानेश्‍वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि वसतिगृहातील हुशार व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल शिरसाट, सचिव महेंद्र शिरसाट, पाथर्डीचे नगरसेवक बजरंगभाऊ घोडके, क्रिडामंत्री यांचे स्वीय सहाय्यक आण्णासाहेब डोळे, शिक्षक परिषदेचे कोषाध्यक्ष बबन शिंदे, महेंद्र राजगुरू, विद्यालयाचे मुख्याध्यापक मिसाळ सर, आत्माराम दहिफळे, शिवाजी शेकडे, संतोष काळोखे, संगीता खेडकर, अबेदा सय्यद, परिमल वरखेडकर आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


महेंद्र शिरसाट म्हणाले की, बोडखे परिवाराच्या माध्यमातून नेहमीच गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्याचे काम करण्यात येत आहे. वर्षभर त्यांचे गरजू विद्यार्थ्यांना विविध प्रकारची मदत देण्याचे कार्य सुरु असते. वंचित, दुर्लक्षीत घटकातील विद्यार्थ्यांना ते सातत्याने शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करत आहे. कचरा वेचकांच्या मुलांपासून ते दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेली मदत प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.


बाबासाहेब बोडखे म्हणाले की, जीवनात पैश्‍यापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञान व कौशल्य आत्मसात केल्यास पैसा सहज प्राप्त होतो. मात्र फक्त पैश्‍याने ज्ञान प्राप्ती होत नाही. जीवनात ध्येय निश्‍चित करा व प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश मिळणार आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जीवनाचा पाया आहे. हा पाया भक्कम झाल्यावर उज्वल भवितव्याची उंच इमारत उभी राहणार आहे. स्पर्धा परीक्षेतून सर्वसामान्य कुटुंबातील मराठी माध्यमांची मुले चमकत आहे. परिस्थितीचा न्यूनगंड न बाळगता शिक्षणाने उंच भरारी घेण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. तर बिकट परिस्थितीतून पुढे आल्याची जाणीव ठेऊन गरजूंना शिक्षणासाठी सातत्याने मदत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *