वस्तीगृहाला आर्थिक मदत
वस्तीगृह गरजू घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आधार देणारे -चारुदत्त खोंडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू व निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ब्राह्मणी (ता. राहुरी) येथील छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वस्तीगृहाच्या दुसऱ्या स्थापना दिनानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
राहुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे व राहुरीचे निवासी नायब तहसीलदार संध्याताई दळवी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी एलसीबीचे ज्ञानेश्वर शिंदे, ब्राह्मणीचे उपसरपंच गणेश तारडे, ग्रामपंचायत सदस्य शांताराम हापसे, महेंद्र तांबे, प्रियंका आंबेडकर, नाथपंथी गोसावी समाज अध्यक्ष सर्जेराव शेगर, जनार्दन चिंचने, दयानंद सावंत, टायगर ग्रुपचे नेवासा तालुकाध्यक्ष बाबाभाऊ शिंदे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन शिंदे, उपाध्यक्ष शिवाजी शेगर, सचिव अनिल सावंत, रोहित सावंत, वस्तीगृह अधीक्षक संतोष चव्हाण, विजय शेगर, बाबाजी सावंत, सागर सावंत, विशाल शेगर, शिवाजी शिंदे, करण शिंदे आदी उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृहाच्या माध्यमातून गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार मिळत आहे. आजची मुले ही भविष्यातील समाजाचे भवितव्य आहे. शिक्षणातून आपले उज्वल भवितव्य घडविण्याच्या दृष्टीकोनाने त्यांना आधार देण्याचे कौतुकास्पद कार्य सुरु आहे. संघर्षातूनच मनुष्य घडत असतो. ध्येयाने प्रेरित होऊन त्या दिशेने वाटचाल करण्याचे त्यांनी आवाहन केले.
निवासी नायब तहसीलदार संध्याताई दळवी यांनी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी वसतिगृहात राहून शिक्षणाने आपले भवितव्य घडवित आहे. मंदिरापेक्षा अशा ज्ञानमंदिरातून समाजाची जडणघडण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात वस्तीगृह चालविणाऱ्या संस्थेला आर्थिक मदत देण्यात आली.