• Mon. Jan 26th, 2026

कचरा वेचकांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

ByMirror

Mar 26, 2024

बोडखे परिवाराच्या माध्यमातून नेहमीच गरजूंना आधार -संपत बारस्कर

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कचरा वेचकांच्या मुलांनी कचरा वेचक न बनता त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे, या उद्देशाने विराज बाबासाहेब बोडखे या विद्यार्थ्याने पुढाकार घेवून शहरात कचरा वेचणाऱ्यांच्या मुलांना स्कूल बॅगसह वह्या, पेन आदी गरजेच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. परीक्षा काळावधी व पुढील शैक्षणिक वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर बोडखे याने स्वत:च्या व मा. आ. अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविला.


नगर-कल्याण रोड येथील लोंढे मळा येथे कचरा वेचकांच्या मुलांना उद्योजक संपत बारस्कर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे, एम.पी. कचरे, प्राचार्य बाबासाहेब शिंदे, प्राचार्य श्रीकृष्ण पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


संपत बारस्कर म्हणाले की, बोडखे परिवाराच्या माध्यमातून नेहमीच गरजूंना आधार देण्याचे काम करण्यात येत आहे. वंचित, दुर्लक्षीत घटकातील विद्यार्थ्यांना ते सातत्याने शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करत आहे. कचरा वेचकांच्या मुलांना परीक्षा कालावधीत दिलेला आधार प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.


बाबासाहेब बोडखे म्हणाले की, जीवनात उभे राहण्यासाठी अरुणकाका जगताप यांनी मोठा आधार दिला. त्यांच्या प्रेरणेने व विचाराने समाजात निस्वार्थ भावनेने कार्य सुरु आहे. शहरात कचरा वेचून उपजिविका करणारी अनेक कुटुंबे आहेत. या कुटुंबातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात आल्यास त्यांचे जीवन बदलणार आहे. पालकांनी देखील मुलांना आपल्या मागे मुलांना कचरा वेचण्यासाठी घेवून न जाता त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचे त्यांनी आवाहन केले. तर उत्तम गुण मिळवणाऱ्या या भागातील विद्यार्थ्यांना सायकलचे बक्षीस देण्याचे त्यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *