बलभीम कुबडे याची राज्य केंद्रीय सदस्यपदी तर गंगाधर कोतकर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड
सेवानिवृत्तांना सन्मानाने जगण्यासाठी महागाईचा विचार करुन योग्य पेन्शन मिळण्याची गरज -गोरख बेळगे
नगर (प्रतिनिधी)- राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना अहिल्यानगर विभागाची वार्षिक सभेत सेवानिवृत्तांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. टिळक रोड येथील श्रमिक कार्यालयाच्या सभागृहात विभागीय सचिव गोरख बेळगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुनिलराव कोल्हे, माजी बॅक संचालक डी.जी. अकोलकर, माजी वाहतूक निरीक्षक राजेंद्र माने, नवनिर्वाचित राज्य केंद्रीय सदस्य बलभीम कुबडे आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटनेचे मयत झालेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहून बैठकीला प्रारंभ करण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे याची राज्य केंद्रीय सदस्यपदी निवड झाल्यामुळे रिक्त असलेल्या जिल्हाध्यक्ष पदावर तारकपूर आगाराचे माजी वाहक गंगाधर कोतकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वार्षिक हिशोब, सेवानिवृत पास पेन्शनबदल संघटनेचे सुरु असलेल्या कामाबाबत आढावा घेण्यात आला.
बलभीम कुबडे म्हणाले की, शंभर सभासदांची नोंदणी झाल्यामुळे राज्यात नगर विभागाचा तिसरा क्रमांक आल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. पुढील काळात सेवानिवृत्ती पास एक वर्षाचा व सर्व बसेसमध्ये त्याचा लाभ मिळण्यासाठी केंद्रीय सदस्यांच्या बैठकीत विषय मांडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सर्वांच्या सहकार्यामुळे केंद्रीय सदस्यपदी काम करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या माध्यमातून सेवानिवृत्तांच्या प्रश्नावर सुरु असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केला. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष गंगाधर कोतकर यांनी पुढील काळात सर्व पदाधिकारी यांना बरोबर घेऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अण्णासाहेब आंधळे यांनी प्रलंबीत प्रश्न सुटण्यासाठी व संघटना वाढीसाठी भावनिक आवाहन केले. शेवगांव आगाराचे के.के. जाधव यांनी स्वतः कोणत्या पदाची अपेक्षा न ठेवता एसटीच्या सेवानिवृत्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
गोरख बेळगे म्हणाले की, अत्यंत कमी असणाऱ्या पेन्शनमध्ये एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा औषधांचा देखील खर्च भागत नाही. त्यांना सन्मानाने जगण्यासाठी महागाईचा विचार करता योग्य पेन्शन मिळण्याची गरज आहे. यासाठी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
सेवानिवृत्त कामगारांच्या प्रश्नावर 2016 ते 2024 मधील कामगार करारातील फरकाच्या रक्कमा लवकर मिळणे बाबत मुठाळ यांनी आपली मागणी मांडली. माजी वाहक एकनाथ औटी यांनी कर्तव्य कवितेतून सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब चव्हाण यांनी संघटनेचे पदाधिकारी सभासदाच्या पाठपुराव्याने अनेक प्रश्न मार्गी लागल्याचे विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन बकरे यांनी केले. यावेळी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेसाठी नेहमीच सहकार्य करणारे कॉ. आनंदराव वायकर यांचे आभार मानण्यात आले. सदर बैठक यशस्वी होण्यासाठी विठ्ठल देवकर, खजिनदार श्रीदेवीदास डहाळे, ताकपेरे आदी सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.