• Tue. Jul 22nd, 2025

कासारेचे ग्राम विकास अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी

ByMirror

Jan 9, 2024

कामात अनियमितता केल्याचा आरोप

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समिती अंतर्गत कासारे ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी यांनी कामात अनियमितता केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देऊन 30 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे.


पारनेर तालुक्यातील मौजे कासारे ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी व सरपंच यांनी संगनमत करून कार्यालयीन कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केली आहे. तर दप्तर अद्यावत ठेवण्यामध्ये जाणीवपूर्वक दिरंगाई केली आहे. ग्रामसभा, मासिक मीटिंग घेण्यात आलेले नसून, पाझर तलाव क्रमांक 1 च्या लिलावाची रक्कम आज अखेर ग्रामपंचायत खात्यावर भरणा केली नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.


संघटनेच्या तक्रारीनुसार पारनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी ग्राम विकास अधिकारी यांच्याशी संगणमत करुन जाणीवपूर्वक अहवालात त्रुटी ठेवल्या आहेत. ग्रामपंचायत अधिनियमानुसार कुठली चौकशी करण्यात आली, त्याबाबत अहवाल तयार करण्यात आलेला नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


कासारे ग्रामपंचायतची दप्तर तपासणी जिल्हास्तरीय कार्यालयाकडून करण्यात यावी व ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी यांनी कामात अनियमितता केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *