आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाचे राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास निवेदन
नगर (प्रतिनिधी)- अपघात टाळण्यासाठी भिंगार मधून जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक व साईड पट्ट्या व उच्च परावर्तकता (रिफ्लेक्टर) बसवण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडे करण्यात आली आहे.
भिंगार राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन रोड येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात उपविभागीय अभियंता अजित गायके व सहकारी इनामदार मॅडम यांची भेट घेऊन सदर प्रश्नांचे निवेदन दिले. यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष शिवम भंडारी, उपाध्यक्ष सागर चवंडके, कार्याध्यक्ष अभिजीत सपकाळ, संपत (तात्या) बेरड, मतीन ठाकरे, अजिंक्य भिंगारदिवे, दीपक लिपाने, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, दिनेश लंगोटे, करन पाटील, गणेश शिंदे, रतनदीप दरवडे आदी उपस्थित होते.
कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 स्टेट बँक चौक ते चाँदबीबी महाल दरम्यान दिशादर्शक व साईड पट्ट्यांचे काम प्रलंबित आहे. तर महामार्गावर रिफ्लेक्टर बसविण्यात आलेले नाही. यामुळे दिवसा व रात्री अंधारात अनेक लहान-मोठे अपघात होत आहे. या दुरावस्थेमुळे अपघातांना आमंत्रण मिळत असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरुन रस्त्यावरुन मार्गक्रमण करावे लागत आहे. या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक व साईड पट्ट्या व उच्च परावर्तकता (रिफ्लेक्टर) बसवण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक व साईड पट्ट्या व उच्च परावर्तकता (रिफ्लेक्टर) नसल्याने एखाद्याचे जीव जाण्याची वाट पाहू नये. तात्काळ या प्रश्नाची दखल घेऊन सदर काम मार्गी लावावे. या रस्त्यावर भिंगार, वडारवाडी, नागरदेवळे,आलमगीर जवळील गावांना जोडणाऱ्या नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. नागरिकांच्या जीवाचा विचार करुन हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा. -अमित खामकर (शहर जिल्हाध्यक्ष, ओबीसी विभाग)