समाजातील उपेक्षित, बेघर व मनोरुग्णांसाठी अविरत कार्य;
रेलफोर फाउंडेशन (पुणे) कडून दहा लाख रुपयाच्या पारितोषिकाने सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रस्त्यावरील बेघर, निराधार आणि मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहिलेल्या सामाजिक कार्यकर्ते तसेच मानवी तस्करीच्या विळख्यात अडकलेल्या 114 आदिवासी कुटुंबांची मुक्तता करून त्यांच्या 48 बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे दिलीप वसंत गुंजाळ यांना पुष्पा नाथानी पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार रेलफोर फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने दिला गेला असून, त्यामध्ये दहा लाख रुपये पारितोषिक व मानचिन्हाचा समावेश आहे. रेलफोर फाउंडेशनचे संचालक दीपक नाथानी व सीएसआर प्रमुख नितीन घोडके यांच्या हस्ते गुंजाळ यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नाथानी परिवार उपस्थित होता.
गुंजाळ यांनी स्थापन केलेले श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ हे अनेक वर्षांपासून समाजातील उपेक्षित घटकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून रस्त्यावरील बेघर, निराधार, मानसिक आजारग्रस्त, तसेच समाजाने विसरलेल्या व्यक्तींना अन्न, वस्त्र, औषधोपचार, निवारा आणि सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून दिला जात आहे. संस्थेने आजवर तीन हजाराहून अधिक निराधार आणि पिडीत व्यक्तींचे पुनर्वसन करून त्यांना नवजीवन दिले आहे.
रेलफोर फाउंडेशनचा पुष्पा नाथानी पुरस्कार हा समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी निःस्वार्थ कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला दिला जातो. यावर्षीचे मानकरी दिलीप गुंजाळ हे त्यांच्या अथक परिश्रमांमुळे आणि संवेदनशीलतेमुळे या पुरस्काराचे खऱ्या अर्थाने पात्र ठरले आहेत. या पुरस्काराद्वारे केवळ त्यांचा गौरव झालेला नाही, तर समाजसेवेची खरी व्याख्या स्वतःसाठी नव्हे, तर इतरांसाठी जगणे! या तत्त्वाची पुनःप्रचिती समाजाला मिळाली असल्याची भावना दीपक नाथानी यांनी व्यक्त केली.
दिलीप गुंजाळ म्हणाले की, हा सन्मान केवळ माझा नसून, अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळातील प्रत्येक कार्यकर्त्याचा, संस्थेच्या विश्वस्तांचा आणि समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक हाताचा आहे. आजवर आम्ही तीन हजारांहून अधिक निराधारांना निवारा, उपचार, पुनर्वसन आणि माणुसकी दिली आहे. एकच तत्त्व नेहमी डोळ्यांसमोर ठेवलं मानवसेवा हीच ईश्वरसेवा! हाच आमच्या कार्याचा आत्मा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गुंजाळ यांच्या कार्यामुळे केवळ मनोरुग्ण व बेघर लोकांचेच नव्हे, तर मानवी तस्करी, व्यसनाधीनता व सामाजिक तिरस्काराच्या सावटाखाली दबलेल्या जीवनांचे पुनर्जन्म घडविण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या संस्थेच्या सेवेतून करुणा, संवेदना आणि माणुसकीचा प्रकाश समाजाच्या प्रत्येक थरात पोहोचत असून, या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
