• Sat. Jan 31st, 2026

कापडगाव ते शिर्डी पायी दिंडीचे अहिल्यानगर शहरातील विळद या ठिकाणी भक्तीमय स्वागत

ByMirror

Jan 31, 2026

ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनने केले वारकऱ्यांचे स्वागत


ही पायी दिंडी सामाजिक एकतेचा संदेश देते -प्रविण साळवे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कापडगाव पंचक्रोशी ते शिर्डी पायी दिंडीचे अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर मनमाड रोड विळद येथे ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनच्या वतीने भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. या दिंडीचे स्वागत करताना संपूर्ण परिसर अोम सार्इ रामच्या गजराने दुमदुमून गेला.


भिंगार येथील ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने विळद येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वागत सोहळ्यात फाऊंडेशनचे संचालक प्रविण साळवे यांनी दिंडी प्रमुखांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. या दिंडीत विनेकरी ह.भ.प. दादासाहेब नाना शिंदे, तुळशीवाल्या सौ. सिंधुताई दादा शिंदे, चोपदार जाधव महाराज, रथचालक पडळकर महाराज, तसेच प्रसिद्ध प्रवचनकार व कीर्तनकार ह.भ.प. बाळासाहेब महाराज शिंदे (लोणंद) व त्यांचे सर्व सहकारी सहभागी झाले होते. यासोबतच कापडगाव, पाडेगाव येथील ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कापडगाव (ता. फलटण, जि. सातारा) येथून निघालेली ही दिंडी एकूण नऊ दिवसांत 240 किलोमीटरचा पायी प्रवास करीत शिर्डीकडे मार्गस्थ आहे. दिंडीचे प्रमुख व दिंडी चालक ह.भ.प. राजेंद्र महाराज आचपळ असून, व्यवस्थापनाची जबाबदारी पांडुरंग पोपट केंजळे, श्री विशाल शिंदे (शिंदेमाळ), दुर्गामाता चॅरिटेबल फाउंडेशन संचालक व इतर सहकारी सांभाळत आहेत. या दिंडीत एकूण 46 महिला व पुरुष वारकरी सहभागी आहेत.


प्रवासाच्या सहाव्या दिवशी दिंडी नगर मनमाड रोड विळद येथे पोहोचताच वारकऱ्यांचे टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्याचे आयोजन ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनच्या संचालिका सौ. सुप्रिया चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. प्रवीण साळवे म्हणाले की, “वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची अध्यात्मिक ओळख आहे. पायी दिंडी ही केवळ यात्रा नसून ती सामाजिक एकतेचा संदेश देते. कापडगाव ते शिर्डी असा तब्बल 240 किलोमीटरचा पायी प्रवास करत वारकरी ज्या निष्ठेने आणि श्रद्धेने वाटचाल करीत आहेत, ती आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनच्या वतीने या वारकऱ्यांचे स्वागत करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. समाजात संस्कार, अध्यात्म आणि सामाजिक सलोखा जपण्याचे कार्य वारकरी संप्रदाय सातत्याने करीत असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *