महापालिकेच्या अनागोंदीचा शिक्षकांना फटका
महापालिका निवडणूक प्रशासनाचा गोंधळ चव्हाट्यावर; विना अनुदानित व सेवेत नसलेल्या शिक्षकांनाही निवडणूक नोटीसा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या निवडणूक तयारीत मोठ्या प्रमाणावर गोंधळ व अनागोंदी समोर आली आहे. निवडणूक प्रशिक्षणाला प्रत्यक्ष उपस्थित राहूनही काही शिक्षकांना अनुपस्थित राहिल्याच्या कारणावरून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने शिक्षकांमध्ये तीव्र संताप व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या या निष्काळजी व विस्कळीत कारभाराचा थेट फटका शिक्षकांना बसत असून, प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे काही शिक्षकांना निवडणूक ड्युटीचे अधिकृत नेमणूक आदेश (ऑर्डर) न देता थेट प्रशिक्षणास अनुपस्थित राहिल्याची नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसद्वारेच संबंधित शिक्षकांची निवडणूक कामासाठी नेमणूक केल्याचे कळविण्यात आल्याने हा प्रकार अधिकच धक्कादायक ठरला आहे.
अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-2026 साठीचे प्रथम प्रशिक्षण दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी पार पडले. या प्रशिक्षणाला अनेक शिक्षक प्रत्यक्ष उपस्थित असतानाही त्यांना गैरहजेरीची नोटीस पाठविण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. तर काही शिक्षक सेवेत नसताना, काही वर्षांपूर्वी शाळा सोडून गेलेले असतानाही त्यांच्या नावाने संबंधित शाळांना नोटीस पाठविण्याचा प्रताप महापालिका प्रशासनाने केला आहे.
विशेष म्हणजे विना अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांनाही निवडणूक ड्युटी लावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कायद्याने आणि नियमांनुसार अशा शिक्षकांवर निवडणूक कामाची जबाबदारी टाकता येत नसताना देखील प्रशासनाने सरसकट नोटीसा पाठवून गोंधळ उडवून दिला आहे.
या नोटीसमुळे अनेक महिला व पुरुष शिक्षकांना खुलासा सादर करण्यासाठी महापालिका कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागले. मानसिक ताण, वेळेचा अपव्यय आणि अनावश्यक धावपळ याला शिक्षकांना सामोरे जावे लागले. काही शिक्षकांनी नोटीसला लेखी खुलासा दिला असला तरी, प्रशासनाच्या चुकीमुळे झालेल्या त्रासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत असा निष्काळजी, बेफिकीर व अनागोंदी कारभार झाल्यास निवडणूक व्यवस्थेची विश्वासार्हताच धोक्यात येईल, अशी भावना शिक्षक वर्गातून व्यक्त केली जात आहे. महापालिका प्रशासनाने तत्काळ या प्रकरणाची चौकशी करून चुकीच्या नोटीसा मागे घ्याव्यात अशी मागणी शिक्षकांकडून केली जात आहे.
निवडणूक काळात शिक्षकांचे हाल होतात. केंद्रावर त्यांना वेळेवर जेवण व पाणी मिळत नाही. मतदानाचा टक्का वाढत असताना, त्या प्रमाणात कर्मचारी संख्या वाढविणे देखील महत्त्वाचे आहे. मागणी केल्याप्रमाणे कर्मचारी संख्या वाढवली जात नाही. मागील निवडणुकांमध्ये ताण-तणावाने काही शिक्षकांचा मृत्यू झाला. शैक्षणिक जबाबदारी सांभाळून शिक्षक एकाच वेळी अनेक काम करत आहे. निवडणुक काळात निर्माण झालेला सावळा-गोंधळ शिक्षकांच्या माथी मारला जात आहे. नाहक त्यांना वेठीस धरले जाते. चूकीच्या पध्दतीने शिक्षकांना दिले गेलेल्या नोटीसा प्रशासनाने मागे घ्यावे. निवडणूक काळात फक्त 20% शिक्षक घ्यावे व इतर विभागातून कर्मचारी वर्ग उपलब्ध करावा. – आप्पासाहेब शिंदे (अध्यक्ष, अहिल्यानगर माध्यमिक शिक्षक संघ)
