• Sun. Jul 20th, 2025

मुसळधार पावसाने केडगावात झालेल्या नुकसानीची उपायुक्तांनी केली पाहणी

ByMirror

May 30, 2025

लवकरच मान्सून सक्रीय होणार असून, भविष्यातील संकट ओळखून उपाययोजना कराव्या -मनोज कोतकर

नगर (प्रतिनिधी)- नुकतेच झालेल्या मुसळधार पावसाने केडगावमध्ये पूर सदृश्‍य परिस्थिती निर्माण होवून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची मनपा उपायुक्त विजयकुमार मुंडे व माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी पहाणी केली.


मुसळधार पावसामुळे केडगावमध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे केडगावमध्ये राहत असणाऱ्या काही नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरले. केडगाव अमरधामची संरक्षण भिंत देखील पावसाने वाहून गेली. देवी रोड वरील आंबेडकर भवनाची भिंतही कोसळली. कांबळे मळा येथील पूल वाहून गेला आहे.


झालेल्या नुकसानीची पहाणी करुन तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनाने माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी मनपा उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना पाहणी करण्यासाठी बोलावून घेतले. यावेळी नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यात आली.


मनोज कोतकर यांनी मुसळधार पावसाने केडगावमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मनपा प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने समस्या सोडविण्यासाठी व उपाययोजना करण्यासंदर्भात पाठपुरावा सुरु आहे. लवकरच मान्सून सक्रीय होणार असून, भविष्यातील संकट ओळखून उपाययोजना कराव्या. लवकरच अमरधामची भिंत बांधली जाणार असून, नागरिकांनी देखील घाबरुन न जाता, मनपा प्रशासन त्यांच्या पाठिशी असल्याचे भावना व्यक्त केली. तर नागरिकांना देखील नुकसान भरपाई मिळण्याची मागणी त्यांनी केली.


उपायुक्त मुंडे यांनी झालेल्या नुकसानी संदर्भात तातडीने ठोस पाऊले उचलून उपाययोजना केल्या जाणार असल्याचे आश्‍वासन दिले. यावेळी शरद ठुबे, सुमित लोंढे, सोनु बापू घेबूड, बाला कोतकर, ऋषी गवळी, शुभम लोंढे, भाऊ गुंड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *