पदकाची कमाई करुन महाराष्ट्र संघाने घेतली आघाडी
शिवसेनेच्या विचाराने मराठी माणसांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे कार्य एकनाथ शिंदे करत आहे -आ. संग्राम जगताप
नगर (प्रतिनिधी)- शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेला रविवारी (दि.19 जानेवारी) उत्साहात प्रारंभ झाले. शिवसेना, युथ कराटे फेडरेशन, स्पोर्ट्स ओके व अहिल्यानगर रुरल ॲण्ड अर्बन कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाडियापार्क क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये कराटेचा थरार नगरकरांना अनुभवयास मिळाला. महाराष्ट्रातील खेळाडूंनी विविध गटात पदकाची कमाई करुन आघाडी घेतली आहे. तर द्वितीय स्थानी गुजरातची आघाडी आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र व राज्य बाहेरून 15 संघांसह 830 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
आमदार संग्राम जगताप यांनी रविवारी सकाळी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन खेळाडूंची लढत लावून स्पर्धेला प्रारंभ केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, युवा सेनेचे शहर प्रमुख पै. महेश लोंढे, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, माजी नगरसेवक मुद्दसर शेख, कराटे असोसिएशनचे साहिल सय्यद, सबिल सय्यद, सरफराज सय्यद, अमोल काजळे, ओमकार शिंदे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी राष्ट्र गीताने स्पर्धेचा प्रारंभ झाला. अनिल शिंदे व सचिन जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. आमदार जगताप यांच्या हस्ते स्पर्धेच्या पंचांचा सत्कार करण्यात आला. सबिल सय्यद यांनी स्पर्धेची माहिती दिली.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, कराटे खेळाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. या खेळाला महत्त्व प्राप्त झाले असून, अनेक खेळाडू पुढे येत आहे. राज्य स्पर्धेत यश संपादन करुन राष्ट्रीय स्पर्धेत गेलेल्या खेळाडूंना शासकीय नोकरी मिळत आहे. वेगवेगळ्या खेळाला करियर म्हणून निवडण्याची खेळाडूंना संधी आहे. कराटे खेळातील खेळाडूंना शासकीय नोकरी मिळेल, या हेतूने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.
तर स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे यांच्यानंतर शिवसेनेच्या विचाराने मराठी माणसांचा खरा वारसा पुढे घेऊन जाण्याचे कार्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहे. सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम करत असल्याने त्यांचा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. 24 तास उपलब्ध असलेला नेता, जनसेवेचा वसा घेऊन काम करत आहे. त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे कार्य या स्पर्धेतून होणार असल्याची भावना आमदार जगताप यांनी व्यक्त केली.
सचिन जाधव म्हणाले की, शिवसेनेने नेहमीच राजकारण करताना समाजकारणाचा वसा जपलेला आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून खेळाडूंना चालना मिळणार आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने राजकारणाला समाजकारणाची जोड देऊन राज्यासह शहरात उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे योगदान सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसीम शेख यांनी केले. आभार सरफराज सय्यद यांनी मानले. स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने खेळाडूंसह पालक वाडियापार्क मध्ये दाखल झाले होते.