• Tue. Oct 14th, 2025

शहरासह जिल्ह्यातील जातीय तणावावर उपमुख्यमंत्री अजीत पवारांची दखल

ByMirror

Oct 3, 2025

द्वेष पसरविणाऱ्यांचा पक्ष न पाहता कठोर कारवाईचे पोलीस अधीक्षकांना आदेश


प्रत्येक ठिकाणी मोहल्ला कमिटी तयार करण्याच्या सूचना

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि.2 ऑक्टोबर) पारनेर येथे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची भेट घेऊन शहरासह जिल्ह्यात जाणीवपूर्वक जातीय तणाव निर्माण करणाऱ्याच्या घटना वारंवार घडत असल्याप्रकरणी लक्ष वेधले. उपमुख्यमंत्री पवार यांनी या प्रश्‍नावर मुस्लिम समाजातील शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली.


जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना बोलावून शहर व जिल्ह्यात जातीय तणाव निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात त्यांचा पक्ष न पाहता कठोर कारवाई करावी असे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. शहरात वाढणारे जातीय तणाव पाहता पोलीस प्रशासनाने कोणतीही व्यक्ती असू द्या, त्याची पर्वा न करता त्याच्याविरोधात कारवाई करावी व प्रत्येक ठिकाणी मोहल्ला कमिटी तयार करून जातीय तणाव कमी होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.


कोठला येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या आरोपींपैकी अनेक आरोपी घटनेशी संबंध नसताना अटक करण्यात आली आहे, त्यांची नावे वगळावी. पोलिसांनी इतर आरोपांच्या नावाखाली सदर गुन्ह्याशी संबंध नसलेल्या व्यक्तींना त्रास देत आहे ते त्वरित थांबवावे. पोलीस प्रशासनाने मॉर्निंग राऊंड वाढवावे. जे लोक समाजात धार्मिक द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रक्षोभक भाषण करत आहेत अशा व्यक्ती विरोधात हेट स्पिच प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.


मुस्लिम समाजातील शिष्टमंडळाने सांगितले की, मागील 10 महिन्यांपासून काही लोकप्रतिनिधी व जातीयवादी संघटनेचे लोक वारंवार तणाव निर्माण होईल असे वक्तव्य करत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्यासाठी जाणून-बुजून कृत्य सुरु आहे. पोलीस प्रशासन त्यांच्या विरोधात कारवाई करत नसल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्याचीही उपमुख्यमंत्री पवार यांनी गांभीर्यपूर्वक दखल घेतली आहे.


जिल्ह्यात मुस्लिम समाजाला टार्गेट करुन हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडणे लावली जात असल्याने अल्पसंख्यांक असलेला मुस्लिम समाज भितीच्या सावटाखाली वावरत आहे. शहरात अशांतता निर्माण झाली असल्याने त्याचा रोजगार, व्यापार व स्थानिक बाजारपेठेवर दुष्परिणाम झाला आहे. वारंवार घटना घडत असल्याने ग्रामीण भागातील मुस्लिम समाजाला असुरक्षित वातावरण निर्माण झाले असल्याचे प्रश्‍न यावेळी उपस्थित करण्यात आले.


याप्रसंगी उबेद शेख, हाजी शौकत तांबोळी, माजी उपमहापौर हाजी नजीर शेख, शाकीर शेख, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, सय्यद खलील, शफी जहागीरदार, अथर खान, इंजि. अख्तर, मतीन सय्यद, राजूशेठ सुपेवाले, ॲड. सय्यद अख्तर, मोबीन मुल्ला तांबटकर, फारुक बागवान, डॉ. रिजवान शेख, ॲड. हाफिज जहागीरदार, माजी पोलीस अधिकारी रऊफ रोख, ॲड. मोबीन, फैय्याज जहागीरदार, फैरोज सय्यद आदी उपस्थित होते.


आय लव्ह मोहम्मद रांगोली विटंबना प्रकरणावरुन शहरात जातीय तणाव निर्माण करण्यात आलेला आहे. यामधील आरोपी व त्याच्या कुटुंबीयांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी तपासून त्याला हद्दपार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तर हे कृत्य घडविण्यास भाग पाडणारा मास्टर मार्इंड शोधण्याची देखील मागणी शिष्टमंडळाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *