मिरवणुकीतील डीजेला फाटा देऊन शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून श्रमिक, कष्टकरी यांच्या वेदनांना हुंकार दिली -मोसीम शेख
अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती सावेडी गावठाण व युवक काँग्रेसच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. मिरवणुकीतील डीजेला फाटा देऊन शालेय विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसीम शेख, दीपक नेटके, उत्सव समितीचे अध्यक्ष पप्पू भिंगारदिवे, सोनू नेटके, हर्षल नवगिरे, सागर इरमल, समीर शेख, अनिल अल्लाड, योगेश भिंगारदिवे, सुमित साळवे, गौरव साठे आदी उपस्थित होते.
मोसीम शेख म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून श्रमिक, कष्टकरी यांच्या वेदनांना हुंकार दिली. कामगार चळवळीत त्यांनी जागृकता निर्माण करुन क्रांतीची दिशा दिल्याचे सांगितले. दीपक नेटके म्हणाले की, अण्णाभाऊंनी आपल्या लेखनातून कष्टकऱ्यांच्या वेदना समाजापुढे आणल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात व नंतरही कामगार-कष्टकरींच्या जीवनाच्या कल्याणासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
