सुमित लोंढे यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
अपघातांचे प्रमाण वाढले
नगर (प्रतिनिधी)- नगर-पुणे राज्य महामार्गावरील केडगाव येथील अंबिकानगर बस स्टॉपजवळील परिसरात स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी केडगाव येथील युवा नेते सुमित लोंढे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या भागात शाळा, बँक, रुग्णालय, तसेच भाजी मार्केट असल्यामुळे दिवसभर नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे शाळकरी मुले, महिला, वृद्ध नागरिक यांचे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वी या ठिकाणी स्पीड ब्रेकर होते, परंतु रस्त्याचे नूतनीकरण झाल्यानंतर ते काढण्यात आले आहेत. त्यानंतर या ठिकाणी अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर अंबिकानगर परिसरात तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत, अशी मागणी केडगाव येथील युवा नेते सुमित लोंढे यांनी केली आहे. या निवेदनप्रसंगी अजित कोतकर, सोमनाथ गुंड, महेश पठारे, तुकाराम कोतकर, गणेश लोंढे, अजित ठुबे, शुभम लोंढे, निलेश लाळगे, माधव झेंडे, गणेश शिंदे, राहुल शिंदे, अमोल कोतकर, दत्तात्रय कोतकर, देवा कोबरने, शुभम शिंदे आदी उपस्थित होते.