धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचे शिक्षक आमदार दराडे यांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सार्वजनिक वाचनालयांचे विविध प्रश्नासह वाचनालयास पुस्तकांसह विविध सोयी-सुविधांचा लाभ मिळण्याच्या मागणीचे निवेदन धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिक्षक आमदार किशोर दराडे यांना देण्यात आले.
वाचनालयाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी शहरात झालेल्या शिक्षक दरबारात आमदार दराडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी माध्यमिकचे आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, वैभव सांगळे, महेंद्र हिंगे, नंदकुमार शितोळे, दिलीप काटे, भास्करराव सांगळे आदी उपस्थित होते.
शहरासह ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सार्वजनिक वाचनालय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मात्र त्यांना पुरेश्या सोयी-सुविधा मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करुन देण्यास मर्यादा येत आहे. वाचनालय पुस्तकांनी संपन्न झाल्यास वाचन संस्कृती बहरणार असल्याचे स्पष्ट करुन, या प्रश्नावर तातडीने लक्ष घालण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
