• Tue. Oct 14th, 2025

तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट व स्वच्छतेची मागणी; नागरदेवळे परिसराला धोका;

ByMirror

Sep 24, 2025

कापूरवाडी तलाव धोकादायक स्थितीत

नागरदेवळे ग्रामस्थांसह खासदार लंके यांचे प्रशासनाला निवेदन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील मौजे नागरदेवळे हद्दीत असलेला कापूरवाडी तलाव मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून धोकादायक स्थितीत आला आहे. तलावाच्या बांधावर मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे, बाभळी वाढल्याने व भिंतीमधून पाणी पाझरण्याने दुर्घटनेची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार निलेश लंके यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक ग्रामस्थ सुशिल कदम व निखिल शेलार यांनी अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांना निवेदन दिले. यावेळी सुशील कदम, निखिल शेलार,सागर खरपुडे,सागर चाबुकस्वार,मुकेश झोडगे, राजेश धाडगे, मोहसीन पठाण,समीर पठाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व नाले, ओढे,बंधारे तुडुंब भरले आहेत. कापूरवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने गेल्या दोन दिवसांपासून सांडावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे नागरदेवळे गावाचे अनेक पुलांवरून पाणी वाहून संपर्क तुटला होता.तलाव लष्करी हद्दीत असल्याने अनेक वर्षांपासून गाळ उपसा झालेला नाही. त्यामुळे पाण्याचा दाब वाढून धोक्याची घंटा वाजू लागली आहे.


तलावाच्या भिंतीला भगदाड पडण्याची शक्यता व्यक्त होत असून, यामुळे नागरदेवळे गावठाण, पाखरे मळा, पानमळकर मळा, पादीर मळा, बिने मळा, लोंढे मळा, खरपुडे वस्ती तसेच भिंगारलगतचा परिसर धोक्यात आला आहे. भिंत फुटल्यास प्रचंड प्रमाणात पाणी बाहेर पडून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान होऊ शकते, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


कापूरवाडी तलावाचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करण्यात यावे, तलावाच्या बांधावरील झाडे-झुडपे व गवताची तातडीने स्वच्छता करावी, पाऊस थांबल्यानंतर व पाणी कमी झाल्यावर तलावातील गाळ उपसा करण्याचा ठोस निर्णय घ्यावा आणि ग्रामस्थ, लष्करी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत पुढील उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *