गवते यांचे 22 सप्टेंबरपासून वांबोरी येथे आंदोलनाला होणार सुरुवात
न्याय मिळाला नाही तर उपोषण स्थळापासून अंत्ययात्रा निघेल -गोरक्षनाथ गवते
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना शिक्षण व उच्चशिक्षण कायमस्वरूपी मोफत मिळावे आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या मागणीसाठी पर्यावरण रक्षक गोरक्षनाथ विश्वनाथ गवते यांनी 22 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. हे उपोषण राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील पाचीमहादेव मंदिर परिसरात होणार असून, प्रशासनाने दखल घेतली नाही तर आत्मदहनाचा इशाराही गवते यांनी दिला आहे.
गोरक्षनाथ गवते हे 2011 पासून पर्यावरण रक्षक उपक्रम सातत्याने राबवीत आहेत. त्यांच्या उपक्रमांतर्गत एक विद्यार्थी एक झाड, एक व्यक्ती एक झाड या मोहिमेबरोबरच कुऱ्हाडबंदी, डी.जे. बंदी, हुंडाबंदी, व्यसनबंदी, प्लास्टिकबंदी, शिकारबंदी, खाजगी सावकारकी बंदी, भ्रष्टाचारबंदी अशा अनेक जनजागृतीपर उपक्रमांचा समावेश आहे. तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव, घर तेथे शौचालय, विषमुक्त शेती, रोगमुक्त भारत, पाणी आडवा पाणी जिरवा, बेटी बचाव-बेटी पढाव यासारखे अभियानही त्यांनी राबवले आहेत.
गवते म्हणाले की, जिल्हा परिषदेपासून महाविद्यालयांपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करणे हेच त्यांचे ध्येय आहे. आजचा विद्यार्थी उद्याचा पर्यावरण रक्षक नागरिक होईल, अशी जाणीव शाळा-कॉलेजच्या माध्यमातून रुजविणे गरजेचे आहे. स्वच्छ, सुंदर, निरोगी व बलशाली भारत घडविण्यासाठीच हे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पर्यावरण रक्षण आणि मोफत शिक्षण या मागण्यांसाठी गवते यांनी यापूर्वीही अनेक उपोषण व आंदोलन केले आहे. आत्मदहनाचा इशारा देऊन देखील मात्र अद्याप प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे 22 सप्टेंबरपासूनचे उपोषण सुरू ठेवले जाईल याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास उपोषण मागे घेतले जाणार नाही, असे गवते यांनी स्पष्ट केले.
याबाबत त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, मागण्या मान्य न झाल्यास 22 सप्टेंबरपासून सुरू होणारे उपोषण हे शेवटच्या श्वासापर्यंत असेल परिवर्तित होईल. या लढाईत पर्यावरणास न्याय मिळाला नाही अखंड भारतातील विद्यार्थ्यांना शिक्षण उच्च शिक्षण मोफत मिळाले नाही तर माझीच वांबोरीतून अंत्ययात्रा निघेल, असे ते म्हणाले. या आंदोलनात पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे नेते तसेच जनतेने सहभागी होऊन या लढ्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन गवते यांनी केले आहे.