अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उपोषणाचा इशारा
नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे माळकुप येथील नगर-कल्याण हायवे लगत गट नंबर 293 मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करून मुरूमची भर टाकल्याने तेथील पंचनामा करून महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा नियम 2017 व 12 जानेवारी 2018 मधील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.
मौजे माळकुप येथील ढवळपुरी फाट्याजवळ नगर-कल्याण हायवे लगत गट नंबर 293 मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करुन मुरुमची भर टाकण्यात आली आहे. सदर जागेचा पंचनामा करून महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा नियम 2017 व 12 जानेवारी 2018 मधील तरतुदीनुसार पंचनामा करून दंडात्मक कारवाई करून भारतीय दंड संहिता कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
जमीन मालकाने कुठलीही रॉयल्टी न भरता मुरूम टाकले आहे. कलम 48 (8) अन्वये अवैधपणे खोदकाम करून वाहतूक केलेले खनिज साहित्य जप्त करण्यात यावे. संबंधित गटात कर्मचारी तलाठी यांनी अवैधरीत्या होणाऱ्या गौण खनिज उत्खननाकडे लक्ष देणे आवश्यक होते, परंतु माळकुप तलाठी यांनी गांभीर्यपूर्वक या बाबींकडे दुर्लक्ष करून शासनाचे नुकसान केले आहे. तलाठी यांनी गावपातळीवर गौण खनिज उत्खननाबाबत स्वतंत्र रजिस्टर ठेवणे गरजेचे होते. त्यांच्या कार्यक्षेत्रात ज्या ठिकाणी गौण खनिज नेण्यात येतील त्याची नोंद तलाठ्याने रजिस्टर मध्ये न चुकता नियमित घेणे कर्तव्य असताना त्यातही कसूर केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर जागेचा तात्काळ पंचनामा करून दंडात्मक कारवाई न झाल्यास येत्या पंधरा दिवसात जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे.