नोकरी, बदली, पदोन्नती आणि विविध शासन सवलतींसाठी होतेय वापर
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) कडून गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विधवा असलेल्या आणि पुनर्विवाह करूनही शासनाच्या विविध योजनांचा लाभ विधवा म्हणून घेत असलेल्या शिक्षिकांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) कडून करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन रिपाईचे भिंगार शहराध्यक्ष स्वप्नील साठे यांनी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात सध्या अनेक विधवा शिक्षिका कार्यरत आहेत. या शिक्षिकांकडे विधवा प्रमाणपत्र असून त्या प्रमाणपत्राचा वापर नोकरी, बदली, पदोन्नती आणि विविध शासन सवलतींसाठी केला जातो. मात्र, या शिक्षिकांपैकी अनेकांनी पुनर्विवाह करून नव्याने संसार सुरू केला असून, काहींना मुलेही झाली आहेत. तरीसुद्धा त्यांनी शासनास पुनर्विवाहाबाबत माहिती दिली नाही.
स्वप्नील साठे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या शिक्षिका आपल्या पतींसह विविध सामाजिक कार्यक्रमात सहभागी होतात, सोशल मीडियावर त्यांचे एकत्र फोटो दिसतात, तरीही त्या शासनाच्या नोंदीत विधवा म्हणून ओळखल्या जातात. या माध्यमातून शासनाची, समाजाची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
रिपब्लिकन पार्टीने प्रशासनाकडे मागणी केली आहे की, तालुक्यातील सर्व विधवा शिक्षिकांची वैवाहिक स्थिती तपासावी, त्यांच्यावरील सेवा पुस्तके आणि सोशल मीडिया रेकॉर्ड तपासून सत्यता जाणून घ्यावी. या संदर्भात दरवर्षी जसे हयातीचे दाखले घेतले जातात, त्याचप्रमाणे विधवांच्या वैवाहिक स्थितीचे पडताळणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रिपाईने असा आरोप केला की, या प्रकरणाकडे प्रशासनातील काही अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, अशा खोट्या शिक्षिकांना अभय देत आहेत. त्यामुळे खऱ्या विधवांवर अन्याय होत आहे, म्हणूनच खोट्या माहितीच्या आधारे लाभ देणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.