बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांची होणार सोय
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-पुणे येथील दत्तात्रय कानिफनाथ सेवा ट्रस्टच्या माध्यमातून पुंडलिक महाराज गरुड यांच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) या ठिकाणी भक्तनिवासाचा लोकार्पण करण्यात आला. श्री क्षेत्र कानिफनाथ गड येथे दर्शनास येणाऱ्या भाविकांची या भक्तनिवासामुळे सोय होणार आहे.
परमपूज्य वासुदेव महाराज यांच्या आशीर्वादाने मंदाताई गरुड यांच्या हस्ते भक्तनिवासाचा लोकार्पण सोहळा पार पडला. पुंडलिक महाराज गरुड म्हणाले की, मढी येथे श्री कानिफनाथ यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यातून लाखो भाविक येतात. अनेकांचे हे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भक्तनिवास चे लोकार्पण माझ्या आईच्या हस्ते झाल्याचा आनंद होत आहे. वासुदेव महाराज यांच्या आशीर्वादाने मी मढी वारी सुरू केली. मढीला जात असताना येणाऱ्या अडचणी दूर कशा करता येतील, यासाठी सातत्याने प्रयत्न केला. मढी ला गेल्यानंतर तेथे निवासाची अडचणी जाणवल्याने सर्वांच्या प्रयत्नातून या ठिकाणी भक्तनिवास उभारण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
या भक्त निवासामुळे पुणे येथून मढीला येणाऱ्या भक्तांची सोय होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे या ठिकाणाहून भक्त मढीला येतात. यासाठी स्वतंत्र भक्त निवास असावे, ही कानिफनाथ भक्तांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. या कार्यक्रमासाठी पुणे व नगर जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
