गुंड प्रवृत्तीच्या गोंधळी बंधूंवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याची पिडीत युवकाची मागणी
अन्यथा कुटुंबीयांसह उपोषणाचा इशारा; पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रेम विवाह केल्याचा राग मनात धरुन मुलीचे गुंड भाऊ जीवे मारण्याचा प्रयत्न करुन वारंवार धमक्या देत असल्याची तक्रार गणेश मारुती कासार या युवकाने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली. तर त्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या बंधूमुळे शहरात फिरणे देखील अवघड झाले असताना त्यांच्यावर विविध पोलीस स्टेशन मध्ये गंभीर गुन्हे दाखल असताना त्यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करुन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर कुटुंबीयांसह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
गणेश कासार यांनी काही वर्षांपूर्वी सर्जेपुरा गोकुळवाडी येथील एका मुलीशी प्रेम विवाह केला होता. दोन तीन वर्ष होऊन एक मुलगी झाली असताना देखील पत्नीचे गुंड प्रवृत्तीचे भाऊ असलेले सुरज गोंधळी व निशांत गोंधळी यांच्याकडून वारंवार जीवे मारण्याची धमकी देत आहे. त्यांना हा विवाह मान्य नसल्याने वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. गोंधळी बंधूवर तोफखाना, एमआयडीसी व कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यांची सर्जेपुरा भागात मोठी दहशत असून, सदर व्यक्तींच्या दहशतीमुळे जगणे अवघड झाले आहे. त्यांच्यामुळे सर्जेपुरा गोकुळवाडी भागात जाणे-येणे मुश्किल झाले असल्याचे कासार यांनी स्पष्ट केले आहे.
यापूर्वी गोंधळी बंधू विरोधात तक्रार केल्यानंतर तोफखाना पोलीसांनी बोलावून संबंधित व्यक्तींना समजूत दिल्याचे सांगून तक्रार अर्ज मागे घेण्यास लावले. त्यानंतर दोन्ही बंधूंनी त्रास दिला नाही. मात्र पुन्हा 3 जानेवारी रोजी गांधी मैदान येथील मार्कंडेय शाळेशेजारी सुरज गोंधळी याने त्याच्या मित्रा सोबत येऊन धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तर शिवीगाळ करुन दमदाटी केली. याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत असताना देखील त्याने पोलीसांसमोर जीवे मारण्याची धमकी दिली. यावर पोलीसांनी कोणतीही कारवाई केली नाही. सदर गोंधळी बंधूपासून मला व माझ्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका निर्माण झाला असल्याचे कासार यांनी निवेदनात म्हंटले आहे.
