ढवळपुरीच्या युवकाची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
वाळू तस्कर करतोय युवकाकडून दंडाच्या रक्कमेची पठाणी वसुली
अहमदनगर (प्रतिनिधी)- अवैध वाळू उपसा करुन वाहतुक करणाऱ्या गाड्या धरुन दिल्याचा संशय घेऊन वाळू तस्करांकडून दंडाची रक्कम वसुल करण्यासाठी जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची तक्रार शकील खुदा शेख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर वारंवार दंडाच्या पैश्याची पठाणी वसुली करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी शेख यांनी केली आहे.
ढवळपुरी, खारवाडी (ता. पारनेर) येथील एका मोठ्या वाळू तस्कराचे वाळूने भरलेली गाडी एका महिन्यापूर्वी के.के. रेंजच्या हद्दीत गस्तीवर असलेल्या लष्करी अधिकाऱ्याने धरली होती. ते वाळूने भरलेले वाहन लष्करी अधिकाऱ्याने पारनेर तहसील यांच्याकडे वर्ग केले. त्यानंतर ती गाडी काही दिवसांनी त्या वाळू तस्कराने दंड भरुन सोडवून आणली.
या घटनेच्या दहा दिवसानंतर त्या वाळू तस्कर व त्याच्या काही साथीदारांनी गावात एकटा जात असताना अडवून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तर तू आमची वाळूची गाडी लष्करी अधिकाऱ्यांना धरून दिली आहे. ती गाडू सोडविण्याठी दीड लाख रुपयाचा दंड लागला असून, त्याची भरपाई तू देणार असल्याचे ते सांगू लागले. सदर दंडाची रक्कम दिली नाहीतर जीवे मारण्यास तो वाळू तस्कर व त्याच्या साथीदाराने धमकावले असल्याचे शेख यांनी निवेदनात म्हंटले आहे.
दंडाची रक्कम वसुल करण्यासाठी तो वाळू तस्कर वारंवार जीवे मारण्याची धमकी देत असून, त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य भयभीत झाले आहे. त्या वाळू तस्करावर कारवाई करुन संरक्षण देण्याची मागणी शेख यांनी केली आहे.