अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय या पंचकोशांचा संशोधनात समावेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अहिल्यानगर येथील प्राध्यापक दादासाहेब रंगनाथ काजळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची विद्यावाचस्पती (पी.एच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये अंतर्भूत असलेल्या “पंचकोश विकसनावर आधारित शिक्षणपद्धती” या विषयावर सादर केलेला हा पुणे विद्यापीठातील पहिलाच संशोधन प्रबंध ठरला असून, तो आजच्या शैक्षणिक गरजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
काजळे यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक जबाबदाऱ्या सांभाळत अथक परिश्रमातून हे संशोधन कार्य पूर्ण केले. ते सध्या विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थानच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांना या संशोधनासाठी गोखले एज्युकेशन सोसायटी, संगमनेर येथील बी.एड. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर यांनी मार्गदर्शन केले.
पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागात त्यांची नुकतेच व्हायवा पार पडली. त्यानंतर समितीचे अध्यक्ष व शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. गीता शिंदे यांनी पी.एच.डी. पदवीसाठी शिफारस केली. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या डीन व ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. सुनिता मगरे या बाह्य परीक्षक म्हणून उपस्थित होत्या.
आपल्या संशोधनात काजळे यांनी अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय या पंचकोशांच्या समतोल विकासातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण, संस्कारित व मूल्याधिष्ठित विकास साधता येतो, हे सविस्तरपणे मांडले आहे. गुरुकुल पद्धतीतील मूल्ये, कृतीयुक्त ज्ञान, अनुभवसंपन्न शिक्षण, विद्यार्थ्यांची आवड व आत्मविश्वास जोपासणारी शिक्षणपद्धती यावर त्यांनी ठोस निष्कर्ष सादर केले आहेत. असा पंचकोशविकसित विद्यार्थी घडल्यास समाज व राष्ट्र पूर्ववैभवाकडे वाटचाल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
काजळे हे विद्यार्थी दशेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात सक्रिय असून, त्यांनी चार वर्षे प्रचारक म्हणूनही काम केले आहे. नगर जिल्ह्याचे सहकार्यवाह म्हणून त्यांनी पाच वर्षे कार्य केले. बालवयात ऋषिकेश येथे वेदांतशास्त्र व श्रीमद्भगवद्गीतेचा अभ्यास केला असून, किर्तन, प्रवचन व रामायण कथेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्यही ते सातत्याने करतात.
या यशाबद्दल विद्याभारती क्षेत्रीय प्रचारक भाई उपाले, पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष डॉ. अरुणराव कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉ. जानवीताई अयाचित, मंत्री रघुनाथ देवीकर यांच्यासह विद्याभारतीच्या प्रांतातील कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. तसेच डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. दादाराव दवाण, कार्यवाह प्रा. सोमनाथ दिघे, सहकार्यवाह डॉ. रवींद्र चोभे, कोषाध्यक्ष अरुणराव धर्माधिकारी, सहकोषाध्यक्ष डॉ. रावसाहेब पवार, मार्गदर्शक डॉ. भानुदास देशमुख, डॉ. शैलेजा देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमरनाथ कुमावत, प्रा. डॉ. गोकुळ लोखंडे, सौ. मनिषा वर्षे, मुख्याध्यापक श्री संदीप भोर तसेच सर्व प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. दादासाहेब काजळे यांच्या या संशोधनात्मक यशामुळे अहिल्यानगरच्या शैक्षणिक क्षेत्रात नवा मानाचा तुरा खोवला गेला असून, सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
