चुकीच्या मथळ्याच्या माध्यमातून पक्षाची बदनामी -राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे
नगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैयक्तिक यु ट्यूब चॅनेलवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाबाबत चुकीची माहिती आणि दिशाभूल करणारा मथळा वापरण्यात आल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाने तीव्र निषेध नोंदवला आहे. भाकपचे राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना 13 जुलै 2025 रोजी निवेदन पाठवून यु ट्यूब चॅनेलवरील चूक तात्काळ दुरुस्त करण्याची आणि जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे.
विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवादी या संघटनेवर बंदी आहे, असे सांगितले होते. मात्र त्यांच्या वैयक्तिक चॅनेलवरील बातमीत भारतीय कम्युनिस्ट पक्षावर बंदी असा चुकीचा मथळा वापरून जनतेमध्ये संभ्रम आणि दहशत निर्माण केली गेली. यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिमेला गंभीर धक्का बसला असून, हेतुपुरस्सर बदनामीचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
कॉ. सुभाष लांडे यांनी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) हे दोन पूर्णपणे भिन्न पक्ष आहेत, याची माहिती मुख्यमंत्री आणि त्यांच्या चॅनेलला असली पाहिजे. त्यामुळे अशा चुकीच्या बातमीमुळे खोडसाळ वृत्तीचा संशय बळावतो. ही बातमी केवळ चुकीची नसून, डाव्या चळवळींविरोधात सुरू असलेल्या योजनाबद्ध मोहिमेचा भाग असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनाच्या माध्यमातून जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या विशेष जनसुरक्षा विधेयकावर देखील तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला आहे. कायद्याच्या आडून सरकार डाव्या पक्षांना टार्गेट करत आहे. कष्टकरी, श्रमिक, विद्यार्थी, महिला आणि आदिवासींसाठी आवाज उठवणाऱ्या चळवळींना दडपण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत असल्याचे म्हंटले आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ऐतिहासिक योगदानाची माहिती देऊन 2025 हे पक्षाचे शताब्दी वर्ष असल्याचे नमूद करण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वतंत्र भारताच्या संसद व विधिमंडळात या पक्षाचे असाधारण योगदान राहिले आहे. फडणवीस यांच्या पक्षाचे अस्तित्व ही नव्हते तेंव्हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्यघटनेच्या चौकटीत राहून काम करणारा प्रमुख मान्यता प्राप्त विरोधी पक्ष होता. क्रांतीसिंह नाना पाटील,कॉ भुपेश गुप्ता, इंद्रजित गुप्ता, चतुरानन मिश्रा, श्रीपाद अमृत डांगे यांच्यासह अनेक नेत्यांचे योगदान स्पष्ट करण्यात आले आहे. तर महाराष्ट्र विधानसभेत कॉ व्ही डी देशपांडे, कॉ चंद्रगुप्त चौधरी,कॉ करुणा भाभी चौधरी,कॉ ए. बी.बर्धन,कॉ दत्ता देशमुख, कॉ माधवराव गायकवाड कॉ सुदामकाका देशमुख,कॉ पी बी कडू,कॉ एकनाथ भागवत,कॉ भास्करराव औटी, कॉ, बाळासाहेब नागवडे,कॉ वकिलराव लंघे यांच्या सह अनेकांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर अमर शेख यांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला होता,तसेच कॉ. गोविंद पानसरे यांच्या बलिदानाचा उल्लेख करून पक्षाच्या संघर्षशीलतेची माहिती नमुद करण्यात आली आहे. सदर युट्यूब चॅनलने चूक दुरुस्त केली नाही, तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
