लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने सावेडी, वाघ मळा येथील केशवराव गाडीलकर हायस्कूलमध्ये महिला दिनानिमित्त शाळेतील मुलींना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याबद्दल समुपदेशन करण्यात आले. अल्पवयीन मुलींवर सातत्याने होणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर जागृती होण्याच्या उद्देशाने लायन्स क्लबच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
डॉ. सिमरन वधवा यांनी मुलींना चांगला आणि वाईट स्पर्श यातील फरक तसेच आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगामध्ये प्रसंगवधान राखून कुणाचीही मदत मिळेपर्यंत स्वतः काय करायचे? या बद्दल माहिती दिली.
डॉ. अनघा पारगावकर यांनी आजच्या परिस्थितीत मुलींनी स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे यावर मार्गदर्शन करुन आपल्याला आलेली प्रत्येक अडचण आपण घरात आई वडील किंवा शाळेत शिक्षकांना निसंकोच पणे सांगण्याचे त्यांनी आवाहन केले.
बदलत्या जीवनशैलीमुळे बळवणारे आजारांपैकी थायरॉईडच्या आजाराचे निदान करण्यासाठी सातवी ते नववीच्या मुलींची स्क्रिनिंग टेस्ट करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना माणकेश्वर यांनी केले. आभार प्रिया मुनोत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अनिल गायकवाड, जयश्री देशपांडे, बाबासाहेब शिंदे आदींसह शिक्षक, शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.