हातात तिरंगे ध्वज घेऊन विद्यार्थ्यांचा भारत मातेचा जयघोष
शाळेत संविधानाचे सामुदायिक वाचन
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नेहरु युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाच्या वतीने संविधान दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. नवनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संविधानाचा जागर करुन गावातून काढलेल्या रॅलीने सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधले.
प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन शाळेत सामुदायिक पध्दतीने संविधान वाचन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, चंद्रकांत पवार, निळकंठ वाघमारे, मंदा साळवे, तृप्ती वाघमारे, सचिव प्रतिभा डोंगरे, भानुदास लंगोटे, तेजस केदारी, प्रमोद थिटे, अमोल वाबळे, प्रियंका डोंगरे-ठाणगे, सुवर्णा जाधव, मंदाताई डोंगरे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली होती. हातात तिरंगे ध्वज घेऊन भारत माता की जय…, वंदे मातरम… च्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळे जगाला प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली. राजेशाही संपुष्टात येऊन सर्वसामान्य मतदारांच्या हातात देशाची सूत्रे आली. संविधानामुळे मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. संविधान एका समाजापुरता मर्यादित नसून, सर्व भारतीयांचा असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांनी संविधानाने देशात समता, बंधुता व स्वतंत्रता प्रस्थापित झाली. संविधानाने नागरिकांना मिळालेल्या कर्तव्य व हक्काची जोपासना झाल्यास देशाचा विकास साधला जाणार असल्याचे सांगून, त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाची माहिती दिली. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.