योग्य व्यक्तींच्या कामाची दखल घेऊन त्यांना जाहीर झालेला पुरस्कार स्वागतार्ह -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कविवर्य चंद्रकांत पालवे यांना जिल्हास्तरीय साहित्य पुरस्कार व लेखक रंगनाथ सुंबे यांना साहित्य गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी पालवे व सुंबे यांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार यांच्या वतीने छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या हुतात्मा स्मृती दिनी हा पुरस्कार दिला जाणार आहे. कविवर्य चंद्रकांत पालवे यांच्या मोहोर उजेड वाटांवर या काव्यसंग्रहाला तर लेखक सुंबे यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, डोंगरे संस्था, नवनाथ युवा मंडळ व वाचनालयाच्या माध्यमातून नेहमीच साहित्यिक व कवींना प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु आहे. नुकतेच तिसरे राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी पालवे यांची निवड करण्यात आली आहे. कवी पालवे व लेखक सुंबे यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान मोठे असून, त्यांचे उत्कृष्ट काव्य संग्रह व पुस्तके प्रकाशित झालेली आहे. योग्य व्यक्तींच्या कामाची दखल घेऊन त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराचे स्वागत असल्याचे त्यांनी सांगितले. पालवे व सुंबे यांनी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पाठबळाने साहित्य क्षेत्रात काम करण्याची आनखी ऊर्जा मिळत असल्याचे सत्काराला उत्तर देताना सांगितले.
