16 शिबिराद्वारे 4 हजार 750 रुग्णांची विविध आरोग्यावर मोफत तपासणी
कृतार्थ व सेवाभावाने आनंदऋषीजी हॉस्पिटलची रुग्णसेवा -वसंतलाल चोपडा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध शिबिरांचा मंगळवारी (दि.9 सप्टेंबर) समारोप झाला. 2 ऑगस्ट पासून सुरु झालेल्या 16 शिबिराद्वारे 4 हजार 750 रुग्णांची विविध आरोग्यावर मोफत तपासणी करण्यात आली. तर यामधील हजारो रुग्णांवर अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
या उपक्रमाचा समारोप इंडो यूरोलॉजिकल मूत्रपिंडी मूत्राशय स्टोन शस्त्रक्रिया शिबिराने झाले. श्रीमती स्व. कुसुमबाई वसंतलाल व स्व. विलास वसंतलाल चोपडा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चोपडा परिवाराच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन चंपालाल चोपडा व वसंतलाल चोपडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी मनसुखलाल पिपाडा, हॉस्पिटलचे कायदेशीर सल्लागार ॲड. शरद पल्लोड, संतोष बोथरा, डॉ. वसंत कटारिया, सतीश लोढा, सुभाष मुनोत, डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, मूत्रविकार शल्यचिकित्सक डॉ. संकेत काळपांडे, डॉ. अमेय सांगळे, डॉ. स्वनीत देशपांडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, वसंतलाल चोपडा वयाच्या 84 व्या वर्षी देखील सकाळ-संध्याकाळ हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहून तळमळीने योगदान देत आहे. हॉस्पिटलच्या सेवा कार्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. तसेच ॲड. शरद पल्लोड यांचे देखील हॉस्पिटलच्या प्रशासकीय कामात सहकार्य मिळून कायदेशीर मार्गदर्शन मिळत आहे. या आरोग्य सेवेत काम करणारा प्रत्येक व्यक्ती कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. सर्वांच्या योगदानाने हे रुग्णसेवेच्या मंदिराचे वैभव उभे राहिले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासह जवळील चार ते पाच जिल्ह्यातील गरजू नागरिकांना या सेवेचा लाभ मिळत असून, शेवटच्या घटकापर्यंत रुग्णसेवा पोहचविण्याचे कार्य सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
वसंतलाल चोपडा म्हणाले की, व्याधीने त्रासलेल्या पीडितांच्या वेदना दूर करण्याचे काम आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सुरु आहे. कृतार्थ व सेवाभावाने आयोग्यसेवेचे कार्य सुरू असून, सर्वसामान्यांना अद्यावत व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सातत्याने भर पडत आहे. या सेवा कार्यात हातभार लावण्याचे भाग्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. शरद पल्लोड म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मानवसेवेच्या महायज्ञात तन, मन, धनाने कार्य सुरू आहे. तारकपूर येथे नेत्रालय उभे राहिले असून, सर्वसामान्यांना चांगली सेवा कशी देता येईल याकडे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. हॉस्पिटलची ही मानव सेवेची ख्याती देशभर पसरली असल्याचे ते म्हणाले.
डॉ. संकेत काळपांडे यांनी मूत्रपिंड, मूत्राशय संदर्भात सर्व विकार व आजारांवर अद्यावत उपचार सुविधा आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्याची माहिती दिली. डॉ. अमेय सांगळे यांनी मूत्रपिंड, मूत्राशयाच्या आजारावर असलेली खर्चिक आरोग्यसुविधा हॉस्पिटलमध्ये अल्पदरात व एका छताखाली अद्यावत तपासणीसह उपलब्ध आहेत. तर आजारांवरील शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत मोफत केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात 111 रुग्णांची मोफत तपासणी तज्ञ डॉक्टरांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.