निवड समिती व संचालकांवरती गुन्हे दाखल करण्याची छावा संघटनेची मागणी
गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थेच्या लॉ कॉलेजमध्ये कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना गैरमार्गाने प्रवेश दिल्याप्रकरणी छावा संघटनेच्या वतीने शिक्षण सचिवांकडे तक्रार केली आहे. तर गैरमार्गाने दिले गेलेले प्रवेश रद्द करुन प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबवून यासंदर्भात चौकशीद्वारे दोषींवर कारवाई करण्याची मागणी छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांनी केली आहे. तर या संदर्भात गुरुवारी (दि.14 डिसेंबर) जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सलग्नित असलेल्या शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थेच्या लॉ कॉलेजमध्ये एलएलबीच्या तीन वर्षीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया शासन निर्णयानुसार ऑनलाईन तसेच ऑफलाईन घेण्यात आली. मात्र पात्र विद्यार्थ्यांना डावलून काही कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने संचालक मंडळ यांच्या संगणमताने भ्रष्टाचार करुन प्रवेश देण्यात आला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
या संस्थेतील यापूर्वीची शिक्षक भरती प्रक्रिया देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. संचालक मंडळाचे बदल अर्ज धर्मदाय उपायुक्तांकडे प्रलंबीत असतानाही सध्याचे संचालक कोणत्या अधिकाराने कारभार करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. पात्र विद्यार्थ्यांना डावलून गैरमार्गाने कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे ही गंभीर बाब असून, याप्रकरणी खातेनिहाय चौकशी करावी, डावलण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा व दोषी निवड समिती व संचालक वरती गुन्हे दाखल करण्याची मागणी छावा संघटनेने केली आहे.