• Thu. Oct 16th, 2025

नागरदेवळे गट व गणातील मतदार यादीत गोंधळ प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

ByMirror

Oct 15, 2025

हजारो नावे दुबार, काही चुकीची व मयत व्यक्तींचीही नावे कायम


गंभीर त्रुटींवर हरकती दाखल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नागरदेवळे जिल्हा परिषद गट आणि गणामध्ये मतदार यादीतील गंभीर त्रुटींमुळे लोकशाही प्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करुन निखील शेलार, मुकेश झोडगे, सागर खरपुडे, राहुल शिंदे, महेश बोरुडे, आणि किरण शेलार यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली. नागरदेवळे, वडारवाडी, बुऱ्हाणनगर आणि परिसरातील अनेक गावांमध्ये हजारो मतदारांची नावे चुकीची, दुबार आणि मयत व्यक्तींची कायम असल्याचे पुराव्यासह स्पष्टीकरण देऊन त्यांनी हरकती नोंदविल्या आहेत.


नागरदेवळे जिल्हा परिषद गट क्र. 48, पंचायत समिती गण क्र. 95 आणि केकती गण क्र. 96 च्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक मतदारांच्या घर क्रमांकांच्या ठिकाणी ओ, एनए, पीएमटी अशा चुकीच्या नोंदी दिसून येत आहेत.तहसील कार्यालयात निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अभिजीत वांढेकर यांच्याकडे या संदर्भात लेखी हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.


नागरदेवळे जिल्हा परिषद मतदार यादीत सुमारे 2,671 मतदारांची नावे दुबार आढळली असून, ही नावे दोन्ही गटांमध्ये जेऊर आणि नागरदेवळे या ठिकाणी नोंदवली गेली आहेत. त्यामुळे मतदानाच्या वेळी दुबार मतदानाची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच पंचायत समिती गण 95 व केतकी गण 96 च्या प्रारूप यादीत 1,631 दुबार नावे असल्याचे निदर्शनास आले आहे. तक्रारदारांनी या सर्व यादींचे सखोल सर्वेक्षण, पुनर्तपासणी आणि योग्य ती सुधारणा करण्याची मागणी केली आहे.


मतदार याद्यांतील त्रुटी दूर न झाल्यास आगामी निवडणुकांची पारदर्शकता धोक्यात येईल, असा इशारा तक्रारदारांनी दिला आहे. संविधानाचे पावित्र्य राखण्यासाठी, उमेदवार आणि मतदारांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने सखोल तपासणी करून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व पारदर्शी मतदार यादी तयार करण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात, असेही तक्रारदारांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *