• Wed. Jul 2nd, 2025

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा महाविकास आघाडीकडे 16 जागांचा प्रस्ताव

ByMirror

Aug 22, 2024

पक्षाच्या शिष्टमंडळाची मुंबईत खा. शरद पवार यांच्याशी चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी)- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यातील 16 मतदारसंघात निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. या 16 जागांचा प्रस्ताव भाकपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचे नेते खासदार शरद पवार यांना मुंबईत भेटून दिला. महाविकास आघाडीने निवडणुकीचे जागावाटप करताना या 16 जागांचा विचार करुन, त्यापैकी असलेल्या जागा भारतीय कम्युनिस्ट पक्षाला सोडाव्यात, अशी मागणी यावेळी भाकपच्या नेत्यांनी केली.


मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीचे नेते खासदार शरद पवार यांची भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉ. डॉ. भालचंद्र कानगो व राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत पक्षाचे राष्ट्रीय नेते कॉ. सुकुमार दामले, राज्य सहसचिव कॉ. राजू देसले, राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. शाम काळे, मुंबईचे सेक्रेटरी कॉ. मिलिंद रानडे, कॉ. अशोक सूर्यवंशी उपस्थित होते.


यावेळी भाकपच्यावतीने राज्यातील 16 जागांचा प्रस्ताव देत, जागावाटपाची चर्चा करताना भाकपसह सर्वच डाव्या पक्षांना योग्य सन्मान देऊन महाविकास आघाडीत सहभागी करून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत खासदार पवार यांनी डाव्या पक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल, असे सांगितले.


दरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जातनिहाय जनगणना व्हावी, तसेच आरक्षणासाठीची 50 टक्क्यांची मर्यादा वाढवावी या मागणीसाठी देशव्यापी मोहिम सुरु केली आहे. या अंतर्गंत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जातनिहाय जनगणना परिषदा घेण्यात येत असून, 6 सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे भाकपच्यावतीने राज्यव्यापी जातनिहाय जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी खा. शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आले.


तसेच पक्षाचे दिवंगत राष्ट्रीय नेते कॉ. ए. बी. बर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नागपूर येथे भव्य कामगार मेळावा आयोजित करण्यात येणार असून, या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे खा. शरद पवार यांनी मान्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *