स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी व भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘स्वच्छ भारत’चा संदेश
स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी -पै. नाना डोंगरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समिती, निमगाव वाघा (ता. नगर) यांच्या संयुक्त विद्यमाने साकूर (ता. संगमनेर) येथील श्री बिरोबा देवस्थान मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व ‘मेरा युवा भारत’ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. डोफ्लगरे संस्थेचे अध्यक्ष तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समितीचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या पुढाकाराने हे अभियान राबविण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक, युवक व नागरिकांनी सहभाग नोंदवून मंदिर परिसर स्वच्छ केले.
या स्वच्छता अभियानात मंदिर परिसरातील कचरा संकलन, परिसरातील स्वच्छता, प्लास्टिक व टाकाऊ वस्तू हटविण्याचे काम करण्यात आले. ‘स्वच्छ भारत’ या राष्ट्रीय अभियानाचा संदेश देत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. स्वच्छ व पवित्र परिसर राखण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना पै. नाना डोंगरे म्हणाले की, सार्वजनिक स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. युवक व नागरिकांनी पुढाकार घेतल्यास स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी राहू शकते आणि त्यातूनच स्वच्छ भारताचे स्वप्न साकार होईल. स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता ती दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेची नितांत गरज आहे. परिसर स्वच्छ असल्यास साथीचे आजार पसरण्याचा धोका कमी होतो आणि नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहते. स्वच्छ व सुंदर भारत घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान देणे अत्यावश्यक आहे.
या अभियानात सुभाष जाधव, सुनील जाधव, साहेबराव बोडखे, श्री नवनाथ युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे, सुखदेव जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते, युवक व ग्रामस्थ सहभागी झाले होते. सर्वांनी श्रमदान करत स्वच्छतेचा संदेश दिला. या उपक्रमासाठी ‘मेरा युवा भारत’चे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे तसेच रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.
