विद्यार्थ्यांनी आठवड्यातून 2 तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याची घेतली शपथ
निरोगी भारताचे स्वप्न साकारण्यासाठी गावा-गावात स्वच्छता निर्माण होणे गरजेची -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- माय भारत उपक्रमातंर्गत नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, न्यू इंग्लिश स्कूल शिंगवे, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत शिंगवे (ता. नगर) येथील न्यू इंग्लिश स्कूल परिसरात स्वच्छता अभियान राबवून विद्यार्थ्यांना सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.

या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर, युवा मंडळ व सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधी हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानात उतरले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सिताराम कोरडे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल अफसर पठाण, सुनिता कवडीवाले, सम्राट शिंदे, सोनाली वाघमारे, प्रतिभा खामकर, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे-खोडदे, अक्षय शिंदे, राहुल घाणे, सोन्याबापू बोरुडे, अर्चना परकाळे, बाळासाहेब भोईटे, गोकुळदास थोरात आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, निरोगी भारताचे स्वप्न साकारण्यासाठी गावा-गावात स्वच्छता निर्माण होणे गरजेची आहे. खेडी स्वच्छ झाल्यास सदृढ आरोग्याची नांदी ठरणार आहे. ग्रामस्थांनी सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यामुळे साथीच्या आजारांसह रोगराईला रोखता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमातंर्गत विद्यार्थ्यांचा अस्वच्छतेमुळे पसरणारी रोगराईची माहिती देऊन उपस्थितांसह विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत जागृक राहण्याचे, घाण करणार नाही व दुसऱ्यालाही घाण करुन देणार नाही आणि आठवड्यातून 2 तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याची शपथ घेतली.
विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक वर्ग गावातील सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवणार असल्याचा व ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबद्दल जागृती करण्याचा संकल्प शाळेच्या वतीने करण्यात आला. मुख्याध्यापक सिताराम कोरडे यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन या अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. या स्वच्छता अभियानासाठी नेहरु युवा केंद्राचे राज्य संचालक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, ज्ञानेश्वर खुरांगे, सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.