वीरांना वंदन करुन देशभक्ती आणि सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गावातील शहीद जवान गोरख नाना जाधव स्मारक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, जाधव परिवार आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला. या उपक्रमातून देशभक्ती आणि सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश एकाचवेळी देण्यात आला.
स्वच्छता अभियानाची सुरुवात वीरांना वंदन! करुन करण्यात आली. भारत माता की जय…, वंदे मातरम… अशा घोषणा देत परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी झाडाझुडपी, कचरा आणि धूळ काढून शहीद स्मारक परिसर स्वच्छ करण्यात आला. स्मारकाजवळील रस्ते व आवार झाडून, पाणी मारून परिसर सुशोभित करण्यात आले. उपस्थितांनी शहीद जवानांना अभिवादन केले. या उपक्रमात डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, उद्योजक जालिंदर जाधव, दूध डेअरीचे चेअरमन भाऊसाहेब जाधव, पोपट भगत, अब्दुल शेख, बापू सुंबे, रविंद्र जाधव, प्रमोद भुसारे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, मेजर शिवाजी पुंड यांसह ग्रामस्थ आणि युवा मोठ्या संख्येने सहभागी झाले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या गावातील वीरपुत्र, शहीद जवान गोरख नाना जाधव यांच्या स्मारकाची स्वच्छता केली, हा फक्त एक उपक्रम नाही, तर आपल्या मनातील देशभक्तीचे प्रतिक आहे. ज्यांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली, त्यांचे स्मारक हे आपल्या गावाचे अभिमान आहे. त्याची स्वच्छता आणि देखभाल ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट करुन सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. सरपंच उज्वलाताई कापसे व उपसरपंच किरण जाधव यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
