नवनाथ विद्यालय व ग्रामस्थांनी केला गौरव
पोलीस दलात कर्तव्यनिष्ठ व सामाजिक संवेदना जपणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज -राजेंद्र शिंदे
नगर (प्रतिनिधी)- जीवाची बाजी लावून पुरात अडकलेल्या ग्रामस्थांचे जीव वाचविणारे नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांचा निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालय व ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान करण्यात आला.
नवनाथ विद्यालयात झालेल्या सन्मान सोहळ्यात नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे व सचिव सुमन कुरेल यांच्या हस्ते प्रल्हाद गीते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, कचरु कापसे, मच्छिंद्र डोंगरे, भाऊसाहेब कांडेकर, मंदा साळवे, तृप्ती वाघमारे, निकिता रासकर, प्रमोद थिटे, तुकाराम पवार, मिरा थिटे, प्रशांत जाधव, लहानबा जाधव आदींसह शालेय विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
राजेंद्र शिंदे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे वाळुंबा नदीला आलेल्या पुरात सहाय्य पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी मोठ्या धाडसाने पाच लोकांचे जीव वाचविले. ढगफुटी सदृश्य परिस्थितीने पुरात अडकलेल्या व्यक्तींसाठी गीते यांनी जीवाची बाजी लावून वाचविले. पोलीस दलात कर्तव्यनिष्ठ व सामाजिक संवेदना जपणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, कर्तव्या पलीकडे जाऊन गीते यांनी पूराच्या संकटात अडकलेल्यांना जीवदान दिले. त्यांनी दाखवलेले कर्तृत्व धाडस सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कामातून ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी नवनाथ विद्यालयाची पहाणी करुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाबद्दल समाधान व्यक्त करुन शिक्षणातून मनुष्य घडतो. शाळेतूनच संस्काराची रुजवण होत असल्याचे त्यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.