आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल केला सन्मान
आदर्श सरपंच पुरस्कार गावाच्या दृष्टीने अभिमानास्पद -शिवाजी कर्डिले
अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या बुऱ्हाणनगर गावाचा विकास झपाट्याने झाला. तीन वर्षांपूर्वी सरपंच पदाची संधी मिळालेले सरपंच रावसाहेब कर्डिले यांनी स्वतःला झोकून देऊन विकास कार्यात योगदान दिले. त्यांना मिळालेला आदर्श सरपंच पुरस्कार गावाच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले यांनी केले.
बुऱ्हाणनगर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच रावसाहेब तुळशीराम कर्डिले यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल गावात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात कर्डिले बोलत होते. याप्रसंगी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ता तापकिरे, उपसरपंच जालिंदर जाधव, सेवा सोसायटी चेअरमन रंभाजी कर्डीले, व्हाईस चेअरमन सागर भगत, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कर्डिले, सुशील तापकीरे, निखिल भगत, अजिनाथ कर्डीले, अमोल धाडगे, वैभव वाघ, दिलावर पठाण, निवृत्ती कर्डीले, नंदू साळवे, प्रसाद तरवडे, माजी सरपंच बाळासाहेब कर्डिले, रामदास जाधव, माजी चेअरमन गंगाधर कर्डिले, नक्षत्राताई पानसरे, जख्खणगाव सोसायटीचे चेअरमन दत्ता वाकळे, अण्णा कचरे, शांताराम कर्डिले, नितीन शिंदे, भाऊसाहेब कर्डिले, ग्रामसेवक शेळके, ह.भ.प. सुदाम महाराज कर्डिले, कर्डिले महाराज आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे कर्डिले म्हणाले की, रस्ते, पाणी, ड्रेनेजलाइन आदी मूलभूत सुविधा देऊन सार्वजनिक स्वच्छता संदर्भात जागरूक राहून सरपंच कर्डिले यांनी उत्कृष्ट कार्य केले. जिल्ह्याला आदर्श ठरावा असे काम करण्यात आले. या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार मिळाल्याचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा त्यांनी दिल्या.
दत्ता तापकिरे यांनी प्रत्येक भागात बारकाईने लक्ष देऊन सरपंच कर्डिले यांनी गावाचा विकास साधला. यासाठी त्यांना शिवाजी कर्डिले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले. अक्षय कर्डिले म्हणाले की, सरपंच कर्डिले यांना मिळालेला पुरस्कार उत्कृष्ट कामाची पावती आहे. गावाची विकासाकडे वाटचाल सुरू असून, शिवाजी कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली बुऱ्हाणनगर एक आदर्श गाव म्हणून पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना रावसाहेब कर्डिले म्हणाले की, हा पुरस्कार एका व्यक्तीचा नसून, संपूर्ण ग्रामस्थांचा आहे. यामध्ये सर्वांचे योगदान असून, हा सर्वांचा सन्मान आहे. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा विकास साधला जात असल्याचे त्यांनी सांगितले.