प्रदर्शनाकडे महिलांचा ओढा
जेऊरचा खपुली गहू, राहुरीचे गावरान तुप, नांदेडची नाचणी बॉबी व राजूरच्या तांदळाची विक्रमी विक्री
अहमदनगर (प्रतिनिधी)- बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्याच्या उद्देशाने सावित्री ज्योती महोत्सवात भरविण्यात आलेल्या बचतगटांच्या विविध वस्तू, खाद्य पदार्थ व अन्न-धान्याच्या उत्पादनांच्या खरेदीसाठी नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात लावण्यात आलेल्या महिला बचत गटांच्या विविध स्टॉलवर खरेदीसाठी गर्दी झाली होती.
जेऊरचा खपुली गहू, नांदेडची नाचणी बॉबी व राजूरच्या तांदळाची विक्रमी विक्री झाली. राहुरीच्या गावरान तुपाच्या विक्रीचा उच्चांक झाला. गृहिणीचे मसाले, पापड, ज्वेलरी, कपडे खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली होती. वांग भरीत बाजरी भाकरी, व्हेज बिर्याणी, सोयाबीन चिल्ली, बटाटा रोल, पनीर चिल्ली, तिखट करंज्या, शेंगाळे आदी खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी स्टॉलवर खवय्यांचीही गर्दी झाली होती.

मेकअप साहित्य, महिलांचे पर्स, गिफ्ट आर्टीकल्स, गॅझेट, ज्वेलरी, बांगड्या खरेदीसाठी महिला व युवतींचा चांगला प्रतिसाद लाभला असून, या चार दिवसीय बचत गट प्रदर्शनात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती प्रदर्शनाचे मुख्य संयोजक ॲड. महेश शिंदे व पोपट बनकर यांनी दिली.
