जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
सांस्कृतिक उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास -तृप्ती कोलते
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा येथे नगर पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नगर तालुकास्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमामध्ये नगर तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून आपल्या सुप्त कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले.
या कार्यक्रमात हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गीय गायन, वेशभूषा स्पर्धा तसेच समूह गीत गायन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कला, आत्मविश्वास व सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण परिसरात विद्यार्थ्यांच्या आनंदोत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
निमगाव वाघा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विस्तार अधिकारी निर्मला साठे, केंद्रप्रमुख महादू उधार, अंबादास गारुडकर, बाबा गोसावी, भगवान बोरुडे, उत्तम भोसले, संजय धामणे, सरपंच उज्वलाताई कापसे, ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, संजय दळवी, राजेंद्र खडके, संगीता कदम, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य राहुल कदम, मुख्याध्यापक शांत नरवडे, वर्षा औटी, बाळासाहेब कापसे यांच्यासह शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते म्हणाल्या की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा केवळ पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित नसून कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमातूनच खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व घडते. अशा गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढतो, संघभावना निर्माण होते आणि त्यांना आपली प्रतिभा सादर करण्याचे व्यासपीठ मिळते. पंचायत समितीच्या माध्यमातून असे उपक्रम सातत्याने राबविले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात विस्तार अधिकारी निर्मला साठे यांनी तालुकास्तरावर होणारे हे सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या अंगी दडलेल्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कोणतीही कमतरता नसून योग्य संधी मिळाल्यास ते आपली गुणवत्ता सिद्ध करतात. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यास नव्हे तर संस्कारांचीही गरज आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे आपली परंपरा, संस्कृती व मूल्ये जपली जातात. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांतून आत्मविश्वासाने पुढे येऊन समाजासाठी आदर्श नागरिक घडवावेत, हीच अपेक्षा असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी किरण सांगळे, विजय शिंदे, सविता गायकवाड, राणी पाटोळे यांनी विशेष परिश्रम घेतले. क
