• Sat. May 10th, 2025

कोरोना महामारीत हॉस्पिटलमध्ये झालेल्या लुटीचा नागरिकांनी वाचला पाढा

ByMirror

Jun 3, 2024

आंदोलन उभे करण्याचा लोकभज्ञाक चळवळीचा निर्धार

पर्यावरणाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सिमेंट जंगल हटाव सत्याग्रह जारी

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत हॉस्पिटलमध्ये लूट झालेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची बैठक हुतात्मा स्मारकात पार पडली. या बैठकीत कोरोना महामारीत झालेल्या फसवणुकी प्रकरणी नागरिकांच्या तक्रारी समजून घेण्यात आल्या. तर कोरोनात काही हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाली असल्याचे निदर्शनास आल्याने लोकभज्ञाक चळवळीच्या माध्यमातून आंदोलन उभे करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


हुतात्मा स्मारक येथे चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करुन आंदोलनाची घोषणा करण्यात आली. कोरोनात लूट झालेल्यांचे पैसे परत मिळावे, फसवणुक करणाऱ्या त्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अजूनही रुग्णांच्या नातेवाईकाकडून सुरु असलेली पैसे वसुली थांबवावी व या सर्व प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्फत उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी आयोग नेमण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या बैठकीसाठी ॲड. कारभारी गवळी, मनसुखलाल गांधी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, विजय भालसिंग, जालिंदर बोरुडे, वीरबहादूर प्रजापती, सुनिल सकट, प्रमोद डिडवाणीया, शाहीर कान्हू सुंबे, आनंद राठोड, अरुण शिंदे, अक्षय शिंदे, अशोक कुलकर्णी, अशोक भोसले, मिराताई सरोदे, संजय बारस्कर, संदीप पवार, संजय मंडलिक आदी उपस्थित होते.


तसेच वाढते तापमान रोखण्यासाठी व पर्यावरणाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सिमेंट जंगल हटाव सत्याग्रह जारी करण्यात आला. तर पाण्याची पातळी वाढविण्यासाठी शहरात रेन हार्वेस्टिंग घराघरात पोहचविण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी हाती घेतले आहे. पर्यावरण दिनानिमित्त (दि.5 जून) बुधवारी सावेडी, धर्माधिकारी मळा येथील फुलारी पेट्रोल पंम्पाच्या मागे फुलारी बाल उद्यान नाव जाहीर करुन झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती ॲड. गवळी यांनी दिली.


निसर्गाशी मैत्री करुन पर्यावरणाचा प्रश्‍न सोडविला जाऊ शकतो. पर्यावरणाच्या गंभीर प्रश्‍नामुळे अनेक नैसर्गिक संकटांना मनुष्याला तोंड द्यावे लागत आहे. तर कोरोना महामारीत हॉस्पिटलमध्ये झालेली लूट ही माणुसकीला काळिमा फासणारी असून, सर्वसामान्यांच्या न्याय, हक्कासाठी लोकभज्ञाक चळवळ तीव्र आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *