• Sun. Nov 2nd, 2025

बोल्हेगावच्या नागरिकांचा नगर-मनमाड महामार्गावर तब्बल दीड तास रास्ता रोको

ByMirror

Sep 13, 2023

सात महिन्यापासून रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी

उपायुक्तांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे

अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील सात महिन्यापासून खोदून ठेवलेल्या रस्त्याचे काम महापालिका प्रशासनाच्या आश्‍वासनानंतर देखील मार्गी लागत नसल्याने संतप्त बोल्हेगावच्या नागरिकांनी बुधवारी (दि.13 सप्टेंबर) सकाळी नगर-मनमाड महामार्गावर तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल ना राजकीय पक्ष, ना नेत्यांचे नेतृत्वशिवाय स्वयंफूर्तीने महिला, युवक-युवती, सर्वसामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


भारत गेला चंद्रावर आम्ही मात्र चिखलावर… अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला. बोल्हेगाव येथील गणेश चौकात सर्व महिला व नागरिक एकत्र येवून मोर्चाने नगर-मनमाड रस्त्यावर आले. सकाळी 10:30 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलकांनी महापालिकेच्या निष्क्रियते विरोधात जोरदार निदर्शने केली. महापालिका आयुक्त येत नाही, तो पर्यंत रस्त्यावरुन न हटण्याचा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला होता.


सात महिन्यांपूर्वी महापालिकेच्या वतीने गणेश चौक ते केशव कॉर्नर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. कामासाठी रस्ता पूर्ण खोदल्याने त्यामध्ये पावसाचे पाणी साचून नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. घरा पर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने व रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे आंदोलन, निवेदन व पाठपुरावा करून देखील सदर रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आलेले नाही. 31 मे पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे नागरिकांना आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र मुदत संपून तीन महिने उलटूनही रस्त्याचे काम सुरू झाले नसल्याने स्थानिक नागरिकांना रास्ता रोकोचा आक्रमक पवित्रा घेतला होता.


पोलीस प्रशासनाने आंदोलकांची समजूत काढून रस्ता मोकळा करण्याच्या सूचना केल्या, मात्र आंदोलकांनी आयुक्त आल्याशिवाय रस्त्यावरून हटणार नसल्याचे स्पष्ट केले. शेवटी मनपावे उपायुक्त श्रीनिवास कुऱ्हे आंदोलन स्थळी हजर झाले. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधून रस्त्याची दुरवस्था झाल्याची मनपा प्रशासनाला जाणीव आहे. सहा महिन्यांपूर्वी सदर रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर ठेकेदाराला दिली होती. महापालिकेच्या निधीतून साडेतीन कोटी रुपयांचे काम आहे. पहिले बिल थांबल्याने ठेकेदाराने पुढील काम थाबवले होते. मात्र आयुक्तांसह संबंधित ठेकेदाराची कालच बैठक घेऊन निधीसाठी त्याला आश्‍वस्त केल्याने त्याने काम सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. आज दुपारपासूनच कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी आश्‍वासन दिले. प्राधान्याने पाईपलाइन शिफ्टिंग करून काम सुरू होणार असल्याचे स्पष्ट केल्याने रास्ता रोको आंदोलन 12 वाजता मागे घेण्यात आले.


दीड तास चाललेल्या या रास्ता रोको मुळे नगर-मनमाड महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तर आंदोलन दरम्यान शासकीय, लष्कराची वाहने व रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करून देण्यात आला होता. रस्ता रोको संपल्यानंतर नागरिकांनी उपायुक्त कुऱ्हे यांना बरोबर घेऊन जावून सदर रस्त्याची झालेली दुरावस्था दाखवली. उपयुक्तांनी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *